कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा जिल्ह्यातील इतर कारखान्यांपेक्षा कमी क्षमतेचा कारखाना असला तरी आपण प्रत्येक गळीत हंगामामध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांनी गाळपास दिलेल्या ऊसापोटी एफआरपी प्रमाणे होणारी ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा करत आलो आहोत. त्यानुसार गत वर्षीच्या गळीत हंगामाध्ये कारखान्यास गाळपास आलेल्या ऊसाची एफआरपीची उर्वरित रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करणार असल्याचे प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी केले.
दौलतनगर- मरळी (ता. पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा विजया दशमी दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, अशोकराव पाटील, डॉ. दिलीपराव चव्हाण, संचालिका सौ. दिपाली पाटील, श्रीमती जयश्री कवर, ॲङ मिलिंद पाटील, डी. पी. जाधव, प्रकाशराव जाधव, बबनराव भिसे, विजयराव मोरे, शंकरराव पाटील, जालिंदर पाटील, टी. डी. जाधव, कार्यकारी संचालक सुहास देसाई, फायनान्स मॅनेजर विनायक देसाई यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्ते,अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. तत्पुर्वी बॉयलर अग्निप्रदिपन कारखान्याचे संचालक सुनिल पानस्कर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. मंगल सुनिल पानस्कर यांचे हस्ते सत्यनारायण महापुजा आयेाजित केली होती.
यशराज देसाई म्हणाले, गत गळीत हंगामातील एफआरपीची 90 टक्के रक्कम ही यापूर्वीच शेतकऱ्यांना दिली आहे. उर्वरित रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग केली जाणार आहे. ना. शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने अडचणीचा काळ असूनही विस्तारीकरणा शिवाय पर्याय नसल्याने कारखान्याच्या विस्तारीकरणाचा धाडसी निर्णय घेतला. तसेच सध्या विस्तारीकरणाच्या पहिल्या टप्याचे काम अंतिम टप्प्यात येण्यासाठी सर्व कर्मचारी यांनी चांगले काम केले आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी आपला पिकवलेला संपूर्ण ऊस हा कारखान्यास गळीतास घालून हा गळीत हंगाम यशस्वी करावा, असे आवाहनही केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. दिलीपराव चव्हाण यांनी केले. आभार अशोकराव पाटील यांनी मानले.
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना 11 टक्के बोनस जाहिर
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे परंपरेप्रमाणे कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीसाठी यंदा 11 टक्के बोनस देत असल्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमप्रसंगी जाहिर केले. कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी यांचेवतीने चेअमन यशराज देसाई यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.