औरंगाबाद : गरजू रुग्णाच्या नातेवाईकांना हेरून त्यांना तब्बल 20 हजार रुपयात रेमडेसीविर विकून इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या सात जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात गुन्हेशाखेच्या पथकाला यश आले आहे.पोलिसांनी या टोळी कडून तब्बल पाच इंजेक्शन, एका कार असा सुमारे पावणे सहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनेश कान्हू नावगिरे वय-28 (रा. जयभीमनगर,घाटी रोड), संदीप सुखदेव रगडे वय-32 (रा.बदनापूर,जि. जालना), प्रवीण शिवनाथ बोर्डे वय-27 (रा.बदनापूर, जि. जालना), नरेंद्र मुरलीधर साबळे, वय-33 (रा.समतानगर, बदनापूर), साईनाथ अण्णा वाहुळ वय-32 (रा.रामनगर, औरंगाबाद), रवी रोहिदास डोंगरे (रा.भाग्यनगर, औरंगाबाद), अफरोझ इकबाल खान (रा.बदनापूर, औरंगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शहरात जालना जिल्ह्यातील एक टोळी स्थनिकांच्या मदतीने रेमडेसीविर इंजेक्शनचा काळा बाजार करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहिती आधारे पथकाने बनावट ग्राहक पाठवून इंजेक्शनची मागणी केली. दरम्यान 20 हजार रुपयात व्यवहार ठरला.व इंजेक्शन घेऊन येताच पथकाने घाटी रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांच्या वस्तीगृहजवळून आरोपी नवगिरे ला रंगेहात अटक केली. ही कारवाई निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली साह्ययक निरीक्षक मनोज शिंदे, अजबसिंग जारवाल,अंमलदार संतोष सोनवणे,शिवाजी झिने, भगवान शिलोटे, राजेंद्र साळुंखे, विशाल पाटील ,आनंद वाहुळ, नितीन देशमुख आदींच्या पथकाने केली.
समोर न येता फोन पे द्वारे व्यवहार
एखाद्या गरजु ने इंजेक्शन ची मागणी केली असता,त्या व्यक्ती कडून अगोदर फोन-पे द्वारे 20 हजार रुपये ट्रान्स्फर करून घेतले जात होते, त्या नंतर नागरिकाला विविध ठिकाणी इंजेक्शन घेण्यासाठी बोलावले जात असे , त्या नंतर एखाद्या निर्जन स्थळी ते इंजेक्शन ठेवले जायचे व ज्या ठिकाणी इंजेक्शन ठेवण्यात आला आहे. ती खून सांगितली जायची हा सर्व व्यवहार समोर न येताच होत होता त्यामुळे आता पर्यंत अनेक गरजु ना या टोळीने चढ्या भावात इंजेक्शन विकल्याचा कयास लावला जात आहे. ही टोळी हे रेमडेसीविर इंजेक्शन कोठून आणत होते याचा शोध घेतला जात आहे.
वॉर्ड बॉय चालवायचा रॅकेट…..
जालना जिल्ह्यातिल कोविड सेंटर मध्ये वॉर्ड बॉय म्हणून तात्पुरती सेवा करणारा व्यक्ती या टोळीचा म्होरक्या आहे.त्याने शहरात अटक केलेल्या आरोपींच्या माध्यमातून रॅकेट सक्रिय केला होता. विविध रुग्णालया बाहेर जाऊन हे आरोपी गरजू ना हेरायचे व त्यांना विश्वासात घेऊन इंजेक्शन विक्रीचा हा काळाबाजार सुरू होता.