औरंगाबाद : देशभरात सगळीकडे कारोना रुग्णांचा आकडा कमी झालेला पाहायला मिळत आहे. त्यात गंभीर रुग्णांची संख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. त्यामुळे रेमेडेसिवीरची मागणीही अत्यंत कमी झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना उपचारतून रेमेडेसिवीर इंजेक्शन वगैरे असले तरी अतिगंभीर रुग्णांना ते मोठ्या प्रमाणात दिले जात होते. परंतु आता मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये चौपट मागणी कमी झाली असून प्रत्येक जिल्ह्यात 5 हजार ते 10 हजार इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे.
मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान रेमेडेसिवीरसाठी अतिगंभीर रुग्णांचे नातेवाईक व खाजगी रुग्णालय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रांगा लावून औषध घेत होते. मागणीच्या तुलनेत अत्यंत कमी साठा असल्याने नातेवाईकांना वनवन भटकावे लागले. काही ठिकाणी तर काळ्याबाजारात यांची 40 ते 50 हजारापर्यंत विक्री झाली.पण रुग्ण संख्या घटल्याने आणि साठा मुबलक असल्याने आता रेमेडेसिवीरची मागणी खूप कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये आजही कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी या इंजेक्शनचा वापर केला जात आहे. शिवाय दरही आता दुपटीने कमी झाल्याचे दिसत आहे. हिंगोलीमध्ये सध्या 290 रुग्ण असून त्यात 125 रुग्ण गंभीर अवस्थेत आहे. त्यांनाही फिजिशियनच्या सल्ल्यानुसारच रेमडेसिविर दिले जात असल्याचे सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मंगेश अहिरे यांनी सांगितले. नांदेडमध्ये तर गेल्या तीन महिन्यात 99 हजार 868 रेमडेसिविर इंजेक्शन मिळाले. तसेच म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी अॅम्फोटेरेसीन 29 वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.