ऑक्सिजन तुटवड्यावर उपाय ः फिलिंग स्टेशनचा अहवाल देण्याच्या आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रशासनाला सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील तथा जिल्ह्यातील हॉस्पिटलना ऑक्सिजनचा तुटवडा भेडसावत आहे. यासाठी आ. चव्हाण यांनी प्रशासनाकडून माहिती घेतली. तसेच कराड मधील काही हॉस्पिटलना सुद्धा संपर्क साधून त्यांच्याकडे किती प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध आहे, याची माहिती घेतली. या माहितीमध्ये एकंदरीतच ऑक्सिजनचा साठा कमी आहे, असे दिसल्यावर आ. चव्हाण यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी तसेच अन्न व औषध विभागाच्या सचिवांशी संपर्क साधून जिल्ह्यातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत माहिती घेतली. यानुसार जिल्ह्यासाठी ७ टँकर पाठविले जात आहेत. तरीही ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत यावर उपाय म्हणून सरकारी जागांमध्ये ऑक्सिजन फिलिंग स्टेशन उभा करण्याबाबत चर्चा झाली व तसा अहवाल दयावा अशा सूचना आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्या.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच आहे. या अनुषंगाने प्रशासनाकडून कोणत्या प्रकारची तयारी करण्यात आली आहे. तसेच काय अपेक्षित आहे, यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला.

या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य तथा रयत सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, प्रांताधिकारी उत्तमराव दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, पै. नानासो पाटील, नरेंद्र पाटील, नितीन थोरात, उदय पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी आढावा बैठकीत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरोनाच्या सद्य परिस्थितीतील बेडची उपलब्धता, रेमडीसीव्हर इंजेक्शन चा पुरवठा, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला एक रुग्णवाहिका तसेच लसीकरण मोहीम कशाप्रकारे राबविली जात आहे. या विषयांवर आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कराड तालुक्यात १२ हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. यामध्ये सह्याद्री हॉस्पिटल, शारदा क्लिनिक एरम हॉस्पिटल, स्व.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड हॉस्पिटल, राजश्री हॉस्पिटल, कृष्णा हॉस्पिटल, श्री हॉस्पिटल, क्रांती सर्जिकल, कोयना हॉस्पिटल, सह्याद्री ऍग्री इंजिनिरिंग, देसाई हॉस्पिटल, निरामय हॉस्पिटल आदी हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या सर्व हॉस्पिटल मध्ये आजच्या तारखेला ८६६ इतक्या बेडची तयारी केली गेली असून यामधील सद्या १८३ बेड उपलब्ध आहेत. बेडच्या संख्येबाबत रोजची माहिती उपलब्ध करण्याबाबत सूचना आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्या.

कराड तालुक्यात 3 ठिकाणी 110 बेड वाढणार

यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, प्रशासनासोबत घेतलेल्या आढावा बैठकीत बेडच्या उपलब्धतेबाबत, ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत, रेमडेसीव्हर इंजेक्शन पुरवठा यासह लसीकरण मोहीम कशाप्रकारे चालू आहे, याची माहिती घेतली. सद्या बेडची उपलब्धता जरी असली तरी आणखी कोविड सेंटर उभारण्याची गरज आहे व त्यानुसार येत्या आठवड्यात यशवंतराव चव्हाण बहुऊद्देशीय हॉल, वडगाव हवेली ग्रामीण रुग्णालय, उंडाळे ग्रामीण रुग्णालय या ३ ठिकाणी ११० बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. येथेच कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. यापुढेही जशी गरज पडेल तशी बेड संख्या वाढविले जातील. तसेच तालुक्यात लसीकरण सगळीकडे व्यवस्थित होत आहे. पण लसींचा पुरवठा मर्यादित असल्याने अडचण भासत आहे. परंतु प्रशासनाने दिवसाला १५ हजार जणांना लस देऊ शकतो, अशी यंत्रणा उभारली आहे. त्यामुळे पुरेशी लस ज्या ज्या वेळी उपलब्ध होईल. त्यावेळी लसीकरण मोहीम चांगल्या प्रकारे राबविता येईल. सद्य कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. आपण लॉकडाऊनचा पर्याय घेत आहोत, हे टाळण्यासाठी सर्वांनी मास्कचा वापर करावा, कायम हात साबणाने धुवावेत तसेच किमान अंतर राखले पाहिजे असे आवाहन सुद्धा यावेळी आ. चव्हाण यांनी केले.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment