टीम हॅलो महाराष्ट्र । भारताचे नवनिर्वाचित लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी काश्मीरमधील कलाम ३७० हटवण्यावरून आज पहिल्यांदाच भाष्य केलं. कलम ३७० रद्द करणे हे एक ऐतिहासिक पाऊल असून, त्यामुळे जम्मू-काश्मीर संपूर्ण भारताशी जोडले जाणार आहे असं नरवणे पुढे म्हणाले. आर्मी दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शहिदांप्रती श्रद्धांजली ही व्यक्त केली.
या निर्णयामुळे पश्चिमेकडच्या शेजाऱ्यांच्या ज्या योजना आहेत, त्यावर परिणाम झाला आहे हे सांगत असताना नरवणे यांचा रोख पाकिस्तानकडे होता. पाच ऑगस्टला संसदेने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले व त्या राज्याचे जम्मू-काश्मीर व लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले. भारताच्या या निर्णयावर पाकिस्तानने बरीच आदळआपट केली. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर अपयशच त्यांच्या पदरी पडले.
“भारतीय लष्कर नेहमीच सतर्क असते. आमचे जागतिक घडामोडींवर लक्ष आहे. दहशतवाद आणि शेजारी देशातून होणारी घुसखोरी खपवून न घेण्याच्या धोरणावर आम्ही ठाम आहेत” असे नरवणे म्हणाले