संजय राऊत यांना पदावरून हाकला! संभाजी भिडेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी ।  संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात उदयनराजेंना शिवरायांचे वंशज असल्याचा पुरावा द्या म्हणून विचारणा केली होती. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळं राजकारण चांगलंच तापलं असतांना या वादात आता शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी उडी घेत राऊत यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे. ‘छत्रपती परंपरा ही हिंदुस्थानची प्राणभूत परंपरा आहे. या परंपरेचा वा वंशजांचा अवमान म्हणजे देशाचा अवमान आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पदावरून हाकला,’ अशी मागणी भिडे यांनी केली आहे.

राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून साताऱ्यानंतर आज सांगलीत बंद पुकारण्यात आला आहे. भिडे यांच्या ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संघटनेनं या बंदची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.

‘ संजय राऊत यांनी उदयनराजे यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. त्यांना राष्ट्रपतीच्या इतकाच मान मिळाला पाहिजे, असं भिडे म्हणाले. ‘आमचा बंद कुठल्याही पक्षाच्या वा शिवसेनेच्या विरोधात नाही. उलट शिवसेना हवी या मताचा मी आहे. मात्र, समाजस्वास्थ्य बिघडू नये याची काळजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यायला हवी. राऊत यांना कुठल्याही पदावर राहण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांना पदावरून काढावे, अशी मागणी भिडे यांनी केली.

Leave a Comment