ऐतिहासिक मकबऱ्या समोरील अडीच एकर जमिनीवरील अतिक्रमण हटविले; महिलेने जेसीबी अडविताच पोलिसांनी घेतले ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | ऐतिहासिक बिबी-का-मकबऱ्यासमोर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सुमारे अडीच एकर जागेवरील अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने मंगळवारी जमीनदोस्त केले. या जागेवर दोन शाळा सुरू होत्या तसेच टपऱ्या, सिमेंटचे खांब लावून जागेचा ताबा घेण्यात आला होता. ही जागा मोकळी करून जागेचा ताबा पुरातत्त्व विभागाला देण्यात आला आहे. यावेळी महापालिकेच्या कारवाईला विरोध करत एका महिलेने जेसीबी अडवून धरली मात्र पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर कारवाई पूर्ण करण्यात आली.

ऐतिहासिक बिबि-का-मकबरा परिसराला अतिक्रमणांचा विळखा पडलेला आहे. अनेक जण ही जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा करतात. बिबी-का-मकबरा पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातून हजारो पर्यटक येतात. या अतिक्रमणांमुळे मकबरा परिसराचे विद्रूपीकरण झाले होते. स्मार्ट सिटी अभियानाच्या माध्यमातून मकबरा परिसर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक डॉ. मिलिंदकमार चवले यांनी महापालिकेला पत्र दिले होते. त्यानुसार प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले. दरम्यान, महापालिकेने जयराज पांडे यांना नोटीस बजावली होती. महापालिकेने बजावलेली नोटीस व पुरातत्त्व विभागाच्या विरोधात पांडेय यांनी न्यायालयात धाव घेतली. या अर्जावर सुनावण्या झाल्या पण पांडेय यांना न्यायालयाने दिलासा दिला नाही. याबाबत महापालिकेच्या पॅनेलवरील वकील दीपक पडोळे यांनी माहिती कळविताच अतिक्रमण हटाव विभागाने मंगळवारी कारवाई केली.

अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या नेतृत्वाखालील पथक मंगळवारी सकाळी 11 वाजता कारवाईसाठी पोचले असता, कारवाईला विरोध करण्यात आला. एका महिलेने जेसीबीसमोर येत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी तैनात असलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागातील पोलिस कर्मचारी व बेगमुरा पोलिसांनी महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने तिला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सुमारे अडीच तासात संपूर्ण अडीच एकर जागा महापालिकेने मोकळी केली व ती पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात देण्यात आली. पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, आर. एस. राचतवार, वसंत भोये, इमारत निरीक्षक सय्यद जमशिद, मझहर अली, पी. बी. गवळी, आर. एस. सुरासे, रवींद्र देसाई, अतिक्रमण हटाव विभागाचे पोलिस निरीक्षक फहीम हाश्‍मी, बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या पीएसआय श्रीमती घाटे, पुरातत्त्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी श्री. रामटेके यांच्या पथकाने केली.

दोन शाळांसह टपऱ्यांचे होते अतिक्रमण
या जागेवर सात टपऱ्या, तसेच एकाने सिमेंटच्या फळ्या लावून जागा ताब्यात घेतली होती. दोन शाळाही सुरू करण्यात आल्या होत्या. ऐतिहासिक दरवाजा देखील बंद करण्यात आला होता. तारेचे कुंपण घालून एके ठिकाणी जागा ताब्यात घेण्यात आली होती.

Leave a Comment