अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा : आमदार मकरंद पाटील यांच्या सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महाबळेश्वर प्रतिनिधी। सकलेन मुलाणी

दोन आठवड्यांपुर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील पश्चिम भागातील विविध रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची आमदार मकरंद पाटील यांनी पाहणी केली. यावेळी या नुकसानीच्या दुरूस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशा सुचना आमदार मकरंद पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना केल्या.

दोन आठवडया पुर्वी 16 व 17 जुन रोजी महाबळेश्वर तालुक्यात मोठी अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील महाबळेश्वर तापोळा, कोट्रोशी तापोळा व कुंभरोशी तापोळा या रस्त्यांवर जागोजागी दरडी कोसळुन मोठे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी रस्ते तुटून ते दरीत कोसळले आहेत तर अनेक ठिकाणी डोंगर उतारावरून वहात येणाऱ्या पाण्या बरोबर दगड माती वाहत आली आणि ती रस्त्यांच्या खाली असलेल्या पाईप मोरी मध्येच अडकली. त्यामुळे डोंगरावरून येणारे पाणी थेट रस्त्यावरून वाहु लागल्याने रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी संरक्षक भिंत्ती व रस्त्यांचे भराव वाहुन गेले. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे साधारण 1 कोटींचे नुकसान झाले आहे.

ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांचे नुकसान झाले आहे त्या त्या ठिकाणी भेट देवुन नुकसानीची पाहणी मंगळवारी आमदार मकरंद पाटील यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड, जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्रसेठ राजपुरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेश गोंजारी, शाखा अभियंता दिनेश पवार, प्रविण भिलारे, सुभाष कदम, डॉ. प्रमोद शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे या भागात दरडी कोसळुन दरवर्षी रस्त्यांचे मोठे नुकसान होते. यावर कायम स्वरूपी उपाय म्हणुन ज्या ठिकाणी पाईप मोऱ्या आहेत अशा महत्वाच्या आठ ते दहा ठिकाणी छोट छोटे पुल बांधण्याची सुचना पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड यांनी केली होती. त्या प्रमाणे छोटे छोटे पुल बांधण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतला आहे अशा पुलांचे प्रस्ताव देखिल सार्वजनिक बांधकाम खात्याने तयार केले आहेत. हे प्रस्ताव तातडीने मंजुर करण्यासाठी तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना मधुन या कामाला लागणारी निधी तातडीने सार्वजनिक विभागाकडे वर्ग करण्यासाठी मंत्रालय स्तरावर आपण प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी आमदार पाटील यांनी दिले.

Leave a Comment