PM Kisan| केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा १९वा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे. त्यानुसार, 24 फेब्रुवारीपासून या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु अनेक शेतकरी ही रक्कम खात्यात जमा झाली नसल्याचे म्हणत आहेत. त्यामुळे, तुमचेही पैसे खात्यात आले नसतील तर योजनेचा इंस्टॉलमेंट स्टेटस कसा तपासायचा किंवा तक्रार कशी करायची याविषयी जाणून घ्या.
पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत सरकारने २२,००० कोटी रुपयांहून अधिक निधी वितरित केला आहे. या योजनेमार्फत पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये एकूण ६,००० रुपये दिले जातात. हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) च्या माध्यमातून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. परंतु अनेकवेळा ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत नाही. अशावेळी काय करायचे? यासाठी ही माहिती वाचा.
KYC प्रक्रिया पूर्ण झाली का पहा
जर तुम्ही PM Kisan योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही, याची खात्री करून घ्या. जर पैसे जमा झाले नसतील, तर त्यामागे काही कारणे असू शकतात. महत्वाचे म्हणजे, ज्या शेतकऱ्यांनी केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना या हप्त्याचा लाभ मिळू शकणार नाही.
हप्ता न मिळाल्यास तक्रार कशी करावी?
तुम्ही पात्र असूनही खात्यात पैसे जमा झाले नाहीत, तर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता. तक्रार नोंदवण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत:
ई-मेलद्वारे तक्रार: pmkisan-ict@gov.in किंवा pmkisan-funds@gov.in
फोन नंबर: 011-24300606 किंवा 155261
टोल फ्री हेल्पलाइन: 1800-115-526
इन्स्टॉलमेंट स्टेटस कसे तपासाल?
शेतकऱ्यांनी PM Kisan योजनेतील आपला हप्ता मिळाला आहे की नाही हे पाहण्यासाठी https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- वेबसाइट उघडल्यावर ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका.
- तुमच्या खात्याच्या स्थितीची माहिती तिथे मिळेल.
दरम्यान, केंद्र सरकार सतत PM Kisan योजनेत सुधारणा करत आहे. यामध्ये लाभार्थ्यांना नियमितपणे केवायसी अपडेट करण्याचा सल्ला दिला जात आहे, जेणेकरून कोणत्याही अडथळ्याशिवाय लाभार्थी शेतकऱ्यांना पैसे मिळू शकतील. परंतु जर तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत नसेल, तर जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन अधिक माहिती मिळवा.