हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केल्यामुळे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेचा भाग बनला आहे. आज जरांगे यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. त्यामुळे त्यांची दिवस प्रकृती खालावत चालली आहे. या पार्श्वभूमीवरच आज सकल मराठा समाजाने (Sakal Maratha Samaj) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी, आता शरद पवार यांनी पुढाकार घेऊन मराठा आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावे, अशी विनंती शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे केली.
पत्रकार परिषद घेत सकल मराठा समाजाने म्हणले की, “आपण पक्ष फुटल्यानंतर महाविकास आघाडीचे जसे नेतृत्व केले तसेच आपण मराठा आरक्षणासाठी आपण सर्व पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांना सोबत घ्यावे. अंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन महाराष्ट्राला मार्गदर्शन करावे. शरद पवार यांनी जर आमच्या आरक्षणासाठी पुढाकार घेऊन मार्ग सोडवला तर आम्ही सर्व मराठा समाज आपल्यासोबत राजकीयदृष्ट्या सक्रिय राहू.”
त्याचबरोबर, “नाशिक जिल्हा जरांगेच्या पाठीमागे उभा आहे. आम्हीही या लढ्यात सहभागी होत आहोत. सकल मराठा समाजाची आमदार आणि खासदार यांना विनंती आहे की, नवनिर्वाचित खासदारांनी तात्काळ अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांना आपल्या लेटर पॅडवर पाठिंबा द्यावा. जर पाठिंबा देणार नसाल तर तुम्ही मतदारसंघात कसे फिरणार तेच बघतो” असा इशारा देखील सकल मराठा समाजाने दिला.
दरम्यान, “पुढील 2 दिवसांत जरांगे यांचे आंदोलन सोडविले नाही तर आम्ही पुढील भूमिका घेऊ. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढाकार घेतला तरी चालेल. सरकारने जरांगे आणि सगेसोयरेची फसवणूक झाली आहे. लोकसभेत मराठा समाजाचा फटका बसला आहे की नाही याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आत्मपरीक्षण करावे. आमच्या मागण्यांचा विचार करावा अजूनही वेळ गेली नाही” असे आजच्या पत्रकार परिषदेत सकल मराठा समाजाने म्हटले.