हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | झारखंडमधील त्रिकुट पर्वतावरील रोपवे दुर्घटनेत अद्यापही 26 लोक अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कर, हवाई दल आणि एनडीआरएफने पुढाकार घेतला असून एमआय-17 हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. गेल्या 21 तासांत या ठिकाणा हुन आत्तापर्यंत 22 यात्रेकरूंची सुटका करण्यात आली. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
बचावकार्यात लष्कराला देखील अनेक अडचणी येत आहेत. वास्तविक, ट्रॉली दोन डोंगरांमध्ये अडकल्या आहेत. हेलिकॉप्टर त्यांच्या जवळ घेऊन जाताच जोरदार वाऱ्यामुळे लोकांची सुटका करणं अवघड बनत आहे. अत्यंत काळजीपूर्वक एअरलिफ्ट केले जात आहे. दोरीच्या साहाय्याने काही जणांची सुटका करण्यात आली.
केबिन जमिनीपासून सुमारे 2500 फूट उंचीवर आहे. त्यामुळे कारवाई सुरू करण्यापूर्वी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी दुपारी ही रोप वे दुर्घटना घडली होती. तांत्रिक कारणांमुळे त्रिकूट टेकड्यांवर रोपवेच्या ट्रॉली एकमेकांवर आदळल्या. या अपघातानंतर अनेक पर्यटक ट्रॉलीमध्येच अडकले होते.
अमित कुमार, खुशबू कुमारी, जया कुमारी, छठी लाल शाह, ड्युटी राम, वीर कुमार, नमन, अभिषेक, भागलपूरचे धीरज, कौशल्या देवी, अन्नू कुमारी, तनु कुमारी, डिंपल कुमार आणि चालक अशी अपघातात अडकलेल्यांची नावे आहेत. सध्या हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.