औरंगाबाद – औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची शिवसेनेची अनेक वर्षांची जुनी मागणी आहे. याविषयी राज्य सरकारने केंद्राकडे पाठवलेला प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे. परंतु, आगामी महानगर पालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करावे असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या सदस्यांनी नामांतराचा ठराव मांडला. त्याला शिवसेनेच्या पदाधिकारी सदस्यांनी अनुमोदन दिले. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी टी व्ही सेंटर रस्त्यावरील मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर या ठिकाणी पार पडली. या सभेत आयत्या वेळचा विषय म्हणून भाजप सदस्य मधुकर वालतुरे यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करावे असा ठराव मांडला. बांधकाम व अर्थ सभापती किशोर बलांडे यांनी या ठरावाला अनुमोदन देत, चिकलठाणा विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे सांगितले. शिवाय शहराचे नामांतर करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच राज्य सरकारने केंद्राकडे पाठवलेला आहे. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी वालतुरे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा असे आवाहन केले. यासोबतच या ठरावाला अनुमोदन दिले.
यानंतर सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला. हा मंजूर ठराव राज्य शासनाकडे पाठविण्यात यावा, अशी सूचना पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांच्याकडे केली. विशेष म्हणजे हा ठराव घेताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सोयीस्कर मौन बाळगणेच पसंत केले. खुद्द जिल्हा परिषद अध्यक्षाही या ठरावावर काहीच बोलले नाही हे मात्र विशेष.