औरंगाबाद – औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील लसीकरणाचा टप्पा कमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची मोठी घोषणा केली आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झाले नसतील तर संबंधित व्यक्तीला उद्यापासून पेट्रोल-डिझेल मिळणार नाही. तसेच गॅस, सीएनजीसुद्धा मिळणार नाही. संबंधित व्यक्तीने लसीचे दोन्ही डोस घेतल्याशिवाय त्यांना इंधन मिळणार नाही. याशिवाय विजेची समस्या असेल तरी दोन्ही लस घेतल्याशिवाय सोडवली जाणार नाही, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी पुन्हा निर्बंध लागू करत असल्याचं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने ते जिल्हे निर्बंधमुक्त करण्यात आले. त्या जिल्ह्यांमध्ये औरंगाबादचा नंबर लागला नाही. कारण औरंगाबादची लसीकरणाची टक्केवारी कमी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 74 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे. 26 टक्के नागरिकांचं अद्यापही लसीकरण झालेलं नाही. तर दोन लस घेतलेल्या नागरिकांची संख्या फक्त 54 टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण वाढवण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
पेट्रोल पंपावर लसीकरणाचं प्रमाणपत्र तपासण्यासाठी जिल्हा प्रशासनातील कर्मचारी किंवा पोलीस असतील. ते कुणाचं लसीकरण झालंय याची शहानिशा करतील. कारण पेट्रोलपंपावर लसीकरणाचं प्रमाणपत्र कुणी तपासावं यावरुन गेल्यावेळी संघर्ष झाल्याचं बघायला मिळाला होता. मात्र, आता सरकारी कर्मचारीच पेट्रोलपंपावर लसीकरणाचं प्रमाणपत्र तपासण्यासाठी असणार आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस याबाबत सतर्कता पाळणार आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये थोडासा वचक असणार आहे. विशेष म्हणजे पेट्रोलपंपावरही लसीकरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.