बुलडाणा प्रतिनिधी । जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी या गावत एका माजी सैनिकानं आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मृतक चराटे असं या माजी सैनिकाच नाव आहे.
चराटे हे काही महिन्यांपूर्वीच सैन्यातील सेवा पूर्ण करून गावी परतले होते. गावातील एका विहिरीमध्ये चराटे यांनी आपली एक ६ वर्षीय मुलगी एक ४ वर्षीय मुलगा यांच्यासह आत्महत्या केली. या तिघांचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले. नागरिकांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली होती. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली.
दरम्यान नागरिकांनी तत्काळ खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मात्र चराटे यांनी आपल्या २ मुलांसह आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अजून काही माहिती मिळाली नाही. मात्र या घटनेन गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे. पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.