कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
पाच-सहा वर्षे सैन्य दलात सेवा झाल्यानंतर कौटुंबिक अथवा वैयक्तिक कारणामुळे स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागलेले अनेक माजी सैनिक महाराष्ट्रात आहेत. त्यांना पोलीस दलात भरती करून घेऊन राष्ट्रसेवेची संधी द्यावी, अशी मागणी मलकापूर (ता. कराड) येथील माजी सैनिक शकील गुलाब मोमीन यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
कोरोनामुळे देशासह महाराष्ट्रात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा आणिबाणीच्या काळात सुरक्षेसाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यासाठी माजी सैनिकांना पोलीस दलात भरती करून घेतल्यास पोलीस दलावरील ताण कमी होईल, असे शकील मोमीन यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. ज्या सैनिकाचा प्रशिक्षणानंतरचा सेवा काळ किमान 5 वर्ष आहे. असे सर्व माजी सैनिक सर्व प्रकारची कामे करण्यास सक्षम आहेत. माजी सैनिकांना पोलीस खात्यात भरती केल्यास भर्ती खर्च आणि प्रशिक्षणाचा खर्च वाचेल. शासनास प्रशिक्षित माजी सैनिक पोलीस म्हणून मिळतील.
तसेच त्यांना लगेच सेवेत कार्यरत करून घेता येईल. माजी सैनिकांना पोलीस दलात भरती करून घेतल्यानंतर शासनाने एक वर्ष त्यांचा कार्यकाळ, प्रामाणिकपणा पाहूनच त्यांची सेवा पुढे नियमित करावी. ज्या निवृत्त सैनिकांचे वय 45 च्या आत आणि सेवा काळ किमान 5 वर्ष असेल, अशा सर्व इच्छुक माजी सैनिकांना पोलीस म्हणून भरती करून घेता येईल. देशसेवा, समाजसेवा हीच आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ सेवा आहे. माजी सैनिक त्याचे पालन करून राष्ट्रसेवा करतील. मुख्यमंत्र्यांनी या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करून माजी सैनिकांना राष्ट्रसेवेची संधी द्यावी, असेही मोमीन यांनी निवेदनात म्हटले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”