औरंगाबाद – शिवाजीनगर रेल्वेगेटच्या भुयारी मार्गासाठी आता सुधारित प्रस्ताव पाठविला जाणार आहे. विकास आराखड्यात नसलेल्या 24 मीटर रस्त्यासह भूसंपादनाचा सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवावा, असे पत्र भूसंपादन अधिकाऱ्यांनी प्रशासकांना दिले आहे. शिवाजीनगर रेल्वेगेटला भुयारी मार्ग नसल्याने याठिकाणी वारंवार वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे बीड बायपास परिसरातील नागरिक त्रस्त आहेत.
वर्षानुवर्षे केलेल्या पाठपुराव्यानंतर आता भुयारीमार्गासाठी प्रयत्न सुरू आहेत. भूसंपादनासाठी लागणाऱ्या निधीपैकी पहिल्या टप्प्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने एक कोटी 81 लाख रुपयांचा निधी महापालिकेकडे जमा केला. हा निधी महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाचे भूसंपादन अधिकारी व्ही. बी. दहे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सूर्यवंशी, महापालिकेचे नगररचना विभागाचे संजय चामले यांनी नुकतीच शिवाजीनगर येथे पाहणी केली होती. यावेळी दीडशे फूट लांब व 24 मीटर रुंद जमिनीचे भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अद्याप भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही.
यासंदर्भात भूसंपादन अधिकारी व्ही. बी. दहे यांनी सांगितले की, भुयारी मार्गासाठी रेल्वेगेट ते देवळाई चौकदरम्यान भूसंपादन करावे लागणार आहे. पण महापालिकेच्या विकास आराखड्यात 24 मीटरचा रस्ता नाही. त्यामुळे महापालिकेकडून भूसंपादनाचा सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात यावा, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.