मुंबई । सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांचे ६७ व्या वर्षी कर्करोगाने आज मुंबईत निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. ऋषी कपूर यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, लॉकडाउनच्या नियमांचं पालन करून ऋषी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रिपोर्टनुसार, ऋषी यांचं शव इस्पितळातून थेट स्मशानभूमीत नेण्यात येईल. ऋषी कपूर यांच्यावर मरिन लाइन येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.
स्मशानभूमीच्या आत आणि बाहेरील परिसरात मुंबई पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. याकाळात सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. नियमांनुसार त्यांच्या अंतयात्रेला फक्त २० जण उपस्थित राहू शकतात.ऋषी कपूर यांच्या कुटुंबियांकडून जारी करण्यात आलेल्या पत्रातही लोकांना या कायदे- नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. साधारणपणे दुपारी २ वाजल्यानंतर अंतिम संस्कारांची प्रकिया सुरू करण्यात येईल. याच स्मशानभूमीत शम्मी कपूर यांचेही अंत्यसंस्कार झाले होते. दरम्यान, काल अभिनेता इरफान खानच्या अंतविधाला सुद्धा फक्त २० जणांनाच उपस्थितीत राहण्याची परवानगी मुबई पोलिसांकडून दिली गेली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”