औरंगाबाद – शहरातील गारखेडा परिसरातील बाळकृष्णनगर- विजय नगरातील शिवनेरी चौकापर्यंत चा रस्त्याचे मागील सहा वर्षात तब्बल चार वेळा भूमिपूजन झाले. परंतु, अद्यापही रस्त्याचे काम मात्र सुरू झालेले नाही. या एकाच रस्त्याच्या कामासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय व्यासपीठावरून अनेक बाता झोडल्या. काल देखील राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा त्या रस्त्याच्या भूमिपूजनाचा बार उडवण्यात आला. आता यावेळी खुद्द मंत्र्यांनीच भूमिपूजन केल्याने आता तरी रस्त्याचे काम होणार की नाही, असा प्रश्न भाजपने केला आहे. रस्त्याच्या कामांमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत मात्र ग्राउंड लेव्हलचे राजकारण पेटले आहे.
याच वर्षी 10 जानेवारी रोजी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रस्त्याच्या कामासाठी भूमिपूजन केले. त्यासाठी शासनाकडून 49 लाख रुपये विशेष निधी माजी नगरसेविका ज्योती मोरे यांनी मंजूर करून घेतला. मनपाने 49 लाखांच्या निवेदने सह वर्कऑर्डर काढून जाधव कंत्राटदाराला काम दिले. मात्र काम वेळेत सुरू झाले नाही म्हणून कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात आले. त्यानंतर माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी आमदार शिरसाट यांच्या मार्फत निधी मिळवला. पुन्हा एकदा जंगी शक्ती प्रदर्शन करत शिरसाट आणि जंजाळ यांनी वार्डात थेट नगर विकास मंत्र्यांनाच आणून महा विकास आघाडीतील आलबेल कारभाराला डिवचत फक्त सेना नेत्यांचे व्यासपीठ भरवले. या कार्यक्रमाला रोहयोमंत्री संदिपान भुमरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, खासदार हेमंत पाटील, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विनोद घोसाळकर, राजू वैद्य आदी नेत्यांची उपस्थिती होती.
आमदार शिरसाटांची टोलेबाजी –
आमदार संजय शिरसाट यांनी भूमिपूजन ची चौथी वेळ असल्याचे सांगून अनेक लोकप्रतिनिधींनी आणि मंत्री आले. पण रस्त्याचे काम सुरू झाले नसल्याचा टोला लगावला. तसेच पूर्व मतदार संघाचे आमदार दुसरे आहेत, मात्र तेथील जनता आपली आहे म्हणून निधी आणल्याचे त्यांनी सांगितले.