कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराडमधील वाढीव त्रिशंकू भागातील वॉर्ड नंबर 13 मधील नागरीकांनी वॉर्डातील विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. शिक्षक कॉलनीपासून पुढे जाणारा रस्ता अनेक वर्ष रखडला असून या वॉर्डातील नगरसेवक सक्षम नसल्यानेच हा प्रश्न रखडल्याचा आरोप आंदोलनकर्ते जावेद नायकवडी यांनी केला आहे.
कराड नगरपालिकेची निवडणूक काही दिवसावर येवून ठेपलेली आहे. तरीही अनेक कामे प्रलंबित असल्याने आता आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. प्रभागात रस्ता, पिण्याचे पाणी, ड्रेनेजसारख्या अनेक बाबतीत असुविधा आहेत. त्याकडे कोणाचेच लक्ष नसल्याचेही आंदोलनाला बसलेल्या नागरीकांनी मत व्यक्त केले.
या आंदोलनामध्ये 13 नंबर वॉर्डमधील आकाश भिसे, ओंकार भंडारी, शृशी रणदिवे, संजय सुर्वे, मशाक शेख सहभागी असून प्रातिनिधिक स्वरुपामध्ये हे सर्वजण आंदोलन करत आहेत. या आंदोलनामुळे वाॅर्ड क्रमांक 13 मधील राजकारण चांगलेच तापलेले पहायला मिळत आहे.