सातारा | कराड तालुक्यातील उंब्रज येथील एकाचे खटाव तालुक्यातील चितळी येथून अपहरण करुन त्यांचा मोबाईल आणि टॅबचा पासवर्ड अनलॉक करुन क्रिप्टोकरन्सीचा 64 लाख रुपयांचा फंड (80 हजार डॉलर) दुसऱ्या वॉलेटला ट्रान्सफर करणाऱ्या 9 जणांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील चाैघांसह कोल्हापूरसह कर्नाटक राज्यातील संशयितांचा समावेश आहे. या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली.
पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सांगितले की, कराड तालुक्यातील उंब्रज येथील ऋषीकेश राजेंद्र शेटे यांचा क्रिप्टोकरन्सीचा 64 लाख रुपयांचा फंड मोबाईल आणि टॅबच्या माध्यमातून दुसऱ्या वॉलेटला ट्रान्सफर केल्याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, 19 डिसेंबर रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास खटाव तालुक्यातील चितळी गावच्या हद्दीत पंढरपूर ते मल्हारपेठ जाणाऱ्या रस्त्यावरील मोहितेमळा या रस्त्याने ऋषीकेश राजेंद्र शेटे उंब्रजकडे निघाले होते. यावेळी त्यांच्या चारचाकीला दुचाकीवरुन आलेल्यांनी पाठीमागून धडक दिली आणि शेटे यांना थांबवले. यानंतर दुचाकीवरील दोघे आणि अन्य दोघांनी शेटे आणि त्यांचे मित्र यांचे तोंड बांधून चारचाकीत घालून अपहरण केले. यावेळी त्यांना शिवीगाळ तसेच दमदाटी करत मारहाण केली. तसेच शेटे यांच्याकडील 95 हजार रुपये किमंतीचा मोबाईल हॅण्डसेट, टॅब, घड्याळ असा ऐवज चोरुन नेला. यावेळी चोरट्यांनी शेटे आणि त्यांच्या मित्राला पुसेसावळी येथील एका शेतात सोडून दिले आणि त्यांनी पलायन केले.
याबाबतची तक्रार शेटे यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञातांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याचा तपास करण्याबाबत एलसीबीला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एलसीबीने तपास सुरु केला होता. या प्रकरणी किरण गुलाब गावीत (वय- 32 वर्षे, रा. विद्यानगर कराड), प्रवीण बाळासोा शेवाळे (वय- 26 वर्षे, रा. घोगाव, ता. कराड), बाळु तुकाराम भोसले (वय- 31 वर्षे, रा. दुर्गामाता चौक, इचलकरंजी, जि. कोल्हापूर), किशोर अंबादास निलंगे (वय- 27 वर्षे, रा. शहापूर, पाटील मळा, इचलकरंजी, जि. कोल्हापूर), विशाल आनंदा शेवाळे(वय- 30 वर्षे, रा. मलकापूर, ता. कराड), बिरजू उर्फ सतीश विलास रजपूत उर्फ कांबळे (वय- 38 वर्षे, रा. शांतीनगर, इचलकरंजी, जि. कोल्हापूर), विशाल उर्फ सागर हरीभाऊ ननावरे उर्फ गुरव (वय- २९ वर्षे, रा. सोमंथळी, ता. फलटण), दुशांत मनोहर पांढरपट्टे, (वय- 31 वर्षे, रा. निपाणी जि. बेळगाव, राज्य कर्नाटक), अभिजीत सुरेश खंडागळे (वय- 35 वर्षे, रा. राधानगरी, जि. कोल्हापूर सध्या रा.निपाणी) यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अटक करण्यात आरोपींवर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, अपहरण, गर्दी मारामारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.