साक्री : हॅलो महाराष्ट्र – नेपाळ मधील पोखरा येथे 6 वी राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत नॅशनल युथस्पोर्ट अँड एज्युकेशन फेडरेशन ऑफ इंडियातर्फे साक्रीतील रोहन रामोळे याने 200 आणि 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली. तर अजय लाडे याने 1500 आणि 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावले. अगदी सामान्य कुटुंबातून आलेल्या या खेळाडूंचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या रोहन रमोले आणि अजय लाडे यांना माणगाव तालुका रायगड येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे शिक्षकवृंद आणि डॉ. राहुल खरात यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे त्यांना स्पर्धेसाठी सकल भोई समाज व मित्रमंडळाचे देखील मोलाचे सहकार्य लाभले आहे.
आज ग्रामीण भागातील अनेक खेळाडू आपल्या कौशल्याच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात नाव उंचावत आहेत. मात्र, त्यांना आर्थिक पाठबळाची कमतरता भासते. अशाच प्रकारे ग्रामीण भागवून सर्वसामान्य कुटुंबातील रोहन आणि अजय यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर नेपाळ येथील चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक प्राप्त केली आहेत.