हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी इंदापूर शहरातील संविधाना चौकात जीवघेणा हल्ला केला. तहसीलदार श्रीकांत पाटील यांची गाडी संविधान चौकात आली असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रोडने जोरदार हल्ला चढविला. भरदिवसा अज्ञातांनी हल्ला केल्याने संपूर्ण इंदापूर तालुक्यात खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) ट्विट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय आहे रोहित पवारांचे ट्विट –
रोहित पवार यांनी ट्विट करत म्हंटल, देवेंद्र फडणवीस, तुम्ही म्हणाला होतात की, ‘‘गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील.’’ गृहमंत्री महोदय, गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जातायेत. रस्त्याने चालणारा सामान्य माणूस सुरक्षित नाही. भर दिवसा इंदापूर तहसीलदारावर हल्ला झाल्याने अधिकारीही सुरक्षित नाही. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांचा पत्ता नाही. कुठंय तुमचं कायद्याचं राज्य? आपण नेहमी नैतिकतेचे कांदे सोलता आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही म्हणाला होतात की, ‘‘गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील.’’
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 24, 2024
गृहमंत्री महोदय…. गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जातायेत… रस्त्याने चालणारा सामान्य माणूस सुरक्षित नाही.. भर दिवसा इंदापूर तहसीलदारावर हल्ला झाल्याने अधिकारीही… pic.twitter.com/5KTBQyl5KV
खरं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये ठाकरे गटाचे नगरसेवक विनोद घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. घोसाळकर यांच्या घराजवळ राहणारा मॉरिस या व्यक्तीने फेसबुक लाईव्ह दरम्यानच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यावेळी विरोधकांनी फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली असता एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी ते माझा राजीनामा मागतील असे देवेंद्र फडणवीस म्हटलं होते. त्याचा विधानाचा धागा पकडत रोहित पवारांनी फडणवीसांवर टीका केली आहे.
दरम्यान, तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हंटल कि, नेहमीप्रमाणी मी इंदापूर प्रशासकीय भावनाकडे निघालो होतो. संविधान चौकात माझी गाडी असता चार चाकी गाडीतून एक हल्लेखोर उतरला आणि लोखंडी राॅडने त्यांनी थेट माझ्यावर हल्ला चढवला. एवढच नव्हे तर सदर व्यक्तींकडून आमच्या अंगावर मिरचीची पूड टाकण्याचा प्रयत्न झाला. यावेळी माझ्या गाडीत चालक आणि मी होतो. आम्ही आमचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आणखी दोन ते तीन हल्लेखोर आले आणि त्यांनी देखील आमच्यावर हल्ला चढवला.