हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने टी-20 क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. T20 क्रिकेटमध्ये 500 षटकार (Rohit Sharma 500 Sixes) मारणारा रोहित भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. चेन्नईविरुद्धच्या कालच्या सामन्यात रोहितने तडाखेबंद शतकी खेळी करत हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला. वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सला चेन्नई विरुद्ध जरी पराभवाचा सामना करावा लागला असला तरी रोहितने मात्र आपल्या धडाकेबाज फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली.
432 सामन्यांत केला कारनामा- Rohit Sharma 500 Sixes
चेन्नई विरुद्ध सलामीला आलेल्या रोहित शर्माने ६३ चेंडूत १०५ धावांची खेळी खेळली. यावेळी त्याने ११ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकार ठोकले. रोहितला अन्य फलंदाजांची साथ न मिळाल्याने मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र रोहितच्या या ऐतिहासिक खेळीने संपूर्ण वानखेडे स्टेडियम मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा घोषणाबाजीने दणाणून गेले. या खेळीसोबतच रोहितने T20 क्रिकेटमध्ये 500 षटकार मारण्याचा महारेकॉर्ड केला आहे.रोहितने 11 व्या षटकात रवींद्र जडेजाच्या चेंडूवर शानदार षटकार मारून टी-20 क्रिकेटमधील 500 षटकार (Rohit Sharma 500 Sixes) पूर्ण केले. रोहित शर्माने 432 सामन्यांच्या 419 डावांमध्ये ही कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा रोहित भारताचा आणि आशियातील पहिला फलंदाज बनला आहे. तसेच जागतिक क्रिकेटमध्ये T20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा जगातील पाचवा फलंदाज बनला आहे.
T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 1056 षटकारांसह ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्यापाठोपाठ किरॉन पोलार्ड (860), आंद्रे रसेल (678) आणि कॉलिन मुनरो (548) यांचा क्रमांक लागतो. आता या यादीत भारताचा हिटमॅन रोहित शर्माचा समावेश झाला आहे. भारतीय संघासाठी हि सर्वात मोठी उपलब्धी मानली जात आहे. भारताकडून सांगायचं झाल्यास रोहित नंतर विराट कोहलीने ३८३ आणि महेंद्रसिंह धोनीने ३२८ सिक्स मारले आहेत.