हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारताचा कर्णधार आणि आक्रमक सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय T20 कारकिर्दीतून निवृत्ती जाहीर केली. मात्र वनडे आणि कसोटी क्रिकेटबाबत मात्र त्याने कोणतेही भाष्य केले नव्हतं. मात्र आगामी चॅम्पियन ट्रॉफीनंतर रोहित आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो अशा चर्चा सातत्याने सुरु असतात. परंतु आता खुद्द रोहितनेच आपण कधीपर्यंत क्रिकेट खेळणार आणि कधी निवृत्ती घेणार याबाबत अपडेट्स दिले आहेत.
रोहित अमेरिकेतील डलास येथे एका कार्यक्रमात सहभागी झाला असता त्याला त्याच्या भविष्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा रोहित म्हणाला की तो भविष्याचा जास्त विचार करणारा माणूस नाही. मी आधीच सांगितले आहे की, मी फार पुढचा विचार करणारी व्यक्ती नाही. त्यामुळे येत्या काही काळासाठी तुम्ही मला खेळताना पाहाल असं त्याने स्पष्ट केलं. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इथून पुढे वनडे आणि कसोटी मध्ये तरी रोहितचा आक्रमक खेळ बघायला या आशेने चाहते खुश आहेत. बीसीसीयचे सचिव जय शाह यांनी यापूर्वीच घोषणा केली आहे कि, रोहित शर्मा चा आगामी चॅम्पियन ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिप स्पर्धेत भारताचा कर्णधार असेल. रोहितच्या नेतृत्वाखाली या दोन्ही ट्रॉफी सुद्धा भारतीय संघ जिंकेल असा विश्वासही जय शाह यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, T20 मधून निवृत्ती घेत असताना रोहितने म्हंटल कि, यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही. हा माझा शेवटचा सामनाही होता. जेव्हापासून मी खेळायला सुरुवात केली तेव्हापासून मी या फॉरमॅटचा आनंद लुटला आहे, रोहितने T20 मध्ये आत्तापर्यंत 159 सामन्यांमध्ये 4231 धावा केल्या असून या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक पाच शतके ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत दोनदा टी-20 विश्वचषक जिंकला. यात रोहित 2007 साली तो संघात नवखा होता मात्र २०२४ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला.