हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार न्यूझीलंडविद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे आणि त्यानंतर होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी रोहित खेळणार नाही. एकदिवसीय मालिकेत मयांक अगरवाल रोहित शर्माची जागा घेईल, तर कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ अजून जाहीर झालेला नाही.
न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या टी -20 सामन्यात फलंदाजीदरम्यान ‘हिटमॅन’ रोहित शर्मा जखमी झाला. या सामन्यात रोहित शर्मा क्षेत्ररक्षणासाठी गेला नव्हता, त्याचा सहकारी साथीदार लोकेश राहुल यांनी टीम इंडियाची कप्तानी केली.
माउंट मौनगुनी येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाचव्या टी -20 सामन्यादरम्यान रोहितच्या जलदगतीने धाव घेण्याच्या नादात पायाचे स्नायू ताणले गेले. त्याने 41 चेंडूत 60 धावा काढल्या आणि तो खेळ सोडून माघारी परतला.