रोहित शर्माने इंझमामला सुनावलं; म्हणाला, कधी तरी डोकं वापरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : टी-20 विश्वचषक 2024 मधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सुपर-8 सामन्यात भारताचा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंगला (Arshdeep Singh) ज्याप्रकारे रिव्हर्स स्विंग मिळाला ते पाहता त्याने नक्कीच चेंडूशी छेडछाड केली असावी असा संशय पाकिस्तानचा माजी खेळाडू इंझमाम उल हकने (Inzmam Ul Haq) व्यक्त केल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) इंझमामला चांगलंच सुनावलं आहे. आम्ही कुठे आणि कोणत्या परिस्थितीत खेळतोय ते बघा.. कधी कधी डोकं वापरा असं म्हणत रोहितने इंझमामला प्रत्युत्तर दिले आहे.

सेमी फायनलपूर्वी रोहित शर्माने पत्रकार परिषद घेत विविध प्रश्नावर भाष्य केलं. यावेळी रोहितला इंझमाम उल हकने अर्शदीप बाबत केलेल्या आरोपावर विचारलं असता रोहित चांगलाच संतापला. याला मी आता काय उत्तर देऊ? असं म्हणत रोहितने नाराजी व्यक्त केली. जर तुम्ही प्रखर सूर्यप्रकाशात खेळत असाल आणि विकेट कोरड्या असतील, तर चेंडू आपोआप रिव्हर्स स्विंग घेतो. आणि फक्त आमच्यासाठीच नाही तर सर्व संघांसाठी बॉल स्विंग होत असतो. त्यामुळे कधी कधी डोकं वापरणंही गरजेचं असतं. विश्वचषक कुठे खेळवले जात आहेत हेही बघावं लागेल. सामने ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडमध्ये खेळवले जात नाहीयत असं म्हणत रोहित शर्माने इंझमाम उल हकला प्रत्युत्तर दिलं.

इंझमाम नेमकं काय म्हणाला होता?

अर्शदीप सिंग जेव्हा 15 वे षटक टाकत होता तेव्हा चेंडू रिव्हर्स स्विंग होत होता. बहुतेक चेंडूशी काहीतरी छेडछाड करण्यात आली होती त्यामुळेच अर्शदीपला रिव्हर्स स्विंग मिळाला असं इंझमाम म्हणाला. नवीन चेंडूसाठी इतक्या लवकर रिव्हर्स स्विंग करणे आवश्यक आहे का? याचा अर्थ असा की. १२ व्या-१३ व्या षटकापर्यंत चेंडू रिव्हर्स स्विंगसाठी तयार झाला होता. जर जसप्रीत बुमराहने असे केले असते तर एकवेळेस हे समजू शकलं असते कारण त्याची गोलंदाजी ॲक्शन तशीच आहे, पण अर्शदीपने १५व्या षटकातच चेंडू रिव्हर्स केला याचा अर्थ त्याने काही तरी खास केले. त्यामुळे पंचांनी डोळे उघडे ठेवून नीट लक्ष दिले पाहिजे होते. जर पाकिस्तानी गोलंदाजांनी हे केले असते, तर सगळीकडे खळबळ उडाली असती, असं इंझमाम म्हणाला होता.