हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह राज्यातील दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी आरपीआयचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीमध्ये भाजपा आणि शिवसेना युतीबद्दल भाष्य केलं. तसेच आपल्या काव्यात्मक शैलीमध्ये आठवलेंनी शुभेच्छा दिल्या.
इथे एकत्र आले उद्धव ठाकरेजी आणि नारायण राणे… मला आठवले महायुतीचे गाणे”, असं म्हणत आठवलेंनी आपल्या खास शैलीत सेना भाजपा युतीचा उल्लेख केला. आठवलेची ही टोलेबाजी ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. विमानतळासाठी सर्वांनीच एकत्र प्रयत्न केले आहेत, असंही आठवले म्हणालेत.
आठवले म्हणाले, शिवशक्ती आणि भीमशक्तीची युती होती तेव्हा मीदेखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केल्याच्या आठवणींना रामदास आठवले यांनी उजाळा दिला. चिपी विमानतळासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले.
दरम्यान, कोकणाच्या विकासाठी हे विमानतळ आवश्यक होतं असं सांगतानाच कोकणामधील पर्यटनाबद्दल आठवलेंनी भाष्य केलं. जगभरातून गोव्यात लोक येतात तशी या विमानतळामुळे कोकणातही येतील असं आठवले म्हणाले. या विमानातून आम्हाला पहिल्यांदाच येण्याची संधी मिळाल्याबद्दल आठवलेंनी आनंद व्यक्त केलं