सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घटना लिहली होती. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा रयतचा पदसिध्द अध्यक्ष असला पाहिजे. मात्र काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ती घटना बदलली. त्यानंतर पारिवारिक 9 जण संस्थेत सदस्यपदी असतात, त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण होता कामा नये. ज्या लोकांची पात्रता नाही त्या लोकांना रयतच्या बॉडीवर घेतलं जातं याचे दुःख वाटते. रयतला देणगी दिली म्हणून मालकी दाखवणं चुकीचं आहे. आज रयतमध्ये पात्रता असणाऱ्यांना नोकरीसाठी खुलेपणाने 40 लाख रुपये मागितले जात असल्याचे तरूण सांगतात. संस्था सातारची असताना सर्व कामे बारामतीच्या एकाच व्यक्तीला दिले जात असल्याने संशयाचे वातावरण निर्माण होत असल्याचा आरोप शिवसेनेचे कोरेगाव मतदार संघाचे आमदार महेश शिंदे यांनी केला आहे.
जनतेचा विचार करून शरद पवार रयत संस्थेचे अध्यक्षपद सोडतील
सातारा येथील रयत शिक्षण संस्थेत होत असलेल्या चुकीच्या गोष्टीवर आ. महेश शिंदे यांनी जाहीरपणे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आ. शशिकांत शिंदे यांनी केलेल्या आरोपालाही आ. शिंदे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, माझी उंची 6 फूट असून शरद पवारांची उंची माझ्यापेक्षा 2 इंचाने मोठी आहे. पवारांनी वंश परंपरा गतीने पुढील पिढीला रयतचे अध्यक्षपद दिल्यास रयत संस्थेसाठी फार मोठा धोका निर्माण होईल. ज्यांना समाजातील कसलीच जाण नाही अशांना या संस्थेवर घेतले आहे. त्यामुळे जनतेचा विचार करून पवार साहेब रयतचे अध्यक्षपद सोडतील, अशी आशा आहे.
रयतसाठी योगदान काय
खासदार उदयनराजेंना रयतच्या बॉडीवर घेतले नाही ही संपूर्ण महाराष्ट्राची खदखद आहे. राजकीय ताकद असल्याने ही संस्था ताब्यात गेली असून हे चुकीचे आहे. राजघराण्याने ही जागा रयत संस्थेच्या मुख्यालयाला दिली आहे. पात्रता नसणारे लोक रयत शिक्षण संस्थेवर गेल्याने संस्थेला धोका निर्माण झाला आहे. पारिवारिक 9 जण रयत संस्थेमध्ये घेतली असून त्यांचे रयतसाठी योगदान काय आहे? असा सवाल आमदार महेश शिंदे यांनी केला आहे.