औरंगाबाद प्रतिनिधी । आरटीओ कार्यालयातील परिवहनेत्तर विभागात एका महिला लिपिकाने तब्बल १५ लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार तीन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी आरटीओ सतीष सदामते यांच्याकडे तक्रार दिली. विशेष म्हणजे, तक्रारीत कोणत्या वाहनांचा कर कसा बुडवण्यात आला, याची माहिती वाहन क्रमांकासह देण्यात आलेली आहे. असे असताना थेट कारवाई करण्याऐवजी चौकशीचा फार्स आरटीओ कार्यालयाने सुरु केलेला आहे.
अपहाराच्या चौकशीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांची समिती नेमण्यात आली. या प्रकरणात अद्यापही चौकशी पूर्ण करुन कारवाई करण्यात आली नाही. उलट अपहार करणाऱ्यांना वाचवण्याचे धोरण सुरु ठेवण्यात आले आहे. भ्रष्टाचारातील एका वाहनाचा तब्बल दिड लाख रुपयांचा बुडवलेला कर अचानक आरटीओच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. हा कर कुणी जमा केला. याबद्दल उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या सर्व आरोपात तथ्य नसल्याचे मैत्रेवार यांनी सांगीतले होते, तर मग तीन अधिकाऱ्यांनी केलेली तक्रार खोटी होती का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.