कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कापील (ता. कराड) येथील ग्रामसभेमध्ये बिल काढण्याच्या कारणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याने राडा झाला. यावेळी ग्रामपंचायत सदस्याची कपडे फाडल्याने चांगलाच गोंधळ उडाला. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली असून दोन्ही बाजूच्या सहा जणांवर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मंगळवार दि. 18 रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत ग्रामपंचायत सदस्य प्रदीप बाळासो जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून पांडुरंग गणपती देशमुख, इंद्रजीत पांडुरंग देशमुख, संभाजी अंतू देशमुख व पतंग श्रीरंग देशमुख (सर्व रा. कापील, ता. कराड) यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रदीप जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तक्रारदार प्रदीप जाधव हे कापील ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत. ते मंगळवारी सकाळी ग्रामसभेला हजर होते. ग्रामसभा चालू असताना ‘आमच्या कामाची बिले तुझ्यामुळे निघत नाहीत, तूच आडवा पडतोस’ असे प्रदीप जाधव याचे विरोधक त्यांना म्हणाल्याने त्यांनी ‘तुमच्या बेकायदेशीर बिलांना मी पाठिंबा देणार नाही’, असे प्रदीप जाधव म्हणाले. त्यामुळे वरील संशयितांनी संगणमत करून तक्रारदार प्रदीप जाधव यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ करत दमदाटी केली. यावेळी उडालेल्या गोंधळामध्ये प्रदीप जाधव यांच्या अंगावरील कपडे फाटली.
तर पांडुरंग गणपती देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रदीप बाळासाहेब जाधव व शशिकांत अशोक जाधव (दोघेही रा. कापील, घुमटमळा, ता. कराड) यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पांडुरंग देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तक्रारदार व विरोधक एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ते एकाच गावातील आहेत. मंगळवारी ग्रामसभेमध्ये पांडुरंग देशमुख यांनी ग्रामसेवक यांना ‘माझे बिल का निघत नाही’, अशी विचारणा केली. त्यावेळी मध्येच उठून विरोधक यांनी तक्रारदार यांना ‘तुझे बिल काढून देत नाही’, असे हातवारे करून अंगावर येण्याचा प्रयत्न केला. तसेच तक्रारदार पांडुरंग देशमुख यांचा मुलगा इंद्रजीत देशमुख याला हाताने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या संभाजी देशमुख व पतंग देशमुख यांनाही मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केल्याचे पांडुरंग देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान कापील ग्रामसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलाच राडा झाला. याची चर्चा दिवसभर तालुकाभर सुरू होती. बिल काढण्याच्या कारणावरून ग्रामसभेत गोंधळ उडाल्याने कापीलसह परिसरात याची चांगलीच चर्चा रंगली होती. याची शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.