सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्हा शिवसेनेत फूट पडल्याची बातमी केवळ अफवा असून कोणाच्याही भुलथाप्पांना बळी न पडता केवळ संघटना बळकटीकडे सर्वांनी लक्ष द्यावे. जिल्ह्यातील 700 शिवसैनिक, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याबाबत दलबदलू पुरूषोत्तम जाधव यांनी जाहीर केले होते. तेव्हा शिवसेनेला खिंडार पडले नसून सदरचा दावा फसवा असून खंडाळा तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सोबतच असल्याचे प्रतिपादन जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे यांनी केले.
राज्याच्या राजकारणात बंडखोर शिंदे गटविरुद्ध मूळ शिवसेना गट यांच्यातील सत्ता संघर्ष सुरू आहे. शिवसेना फोडण्यासाठी जिल्हावार माणसे नेमण्यात आल्याची चर्चा सगळीकडेच रंगत आहे. शिवसेना माजी जिल्हाप्रमुख व भाजपवासी झालेले पुरुषोत्तम जाधव यांनी ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवका समवेत सातारा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये 700 शिवसैनिक पदाधिकारी शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे यांनी पत्रकार परिषद आयोजित करत पुरूषोत्तम जाधव यांच्यावर टीकास्त्र सोडले. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी शिवसेना सक्रिय सभासद नोंदणी फॉर्म भरून सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
यशवंत घाडगे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख जो निर्णय घेतील, त्या निर्णयाशी खंडाळा तालुका शिवसेना पदाधिकारी बांधील आहेत. त्याबाबतचा ठराव सदर बैठकीत घेण्यात आला. संघटनात्मक बांधणी मजबूत करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेला ५०,००,००० सभासद नोंदणीचा संकल्प पूर्ण करणेसाठी २०,००० नवीन सक्रिय सभासद नोंदणी करण्याचा संकल्प जाहीर केला. सातारा जिल्हा शिवसेनेत फूट पडल्याची बातमी केवळ अफवा असून कोणाच्याही भुलभुलय्यांना बळी न पडता केवळ संघटना बळकटीकडे सर्वांनी लक्ष द्यावे.
या बैठकीस शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, जिल्हा महिला आघाडी संघटिका शारदा जाधव, उपजिल्हाप्रमुख अजित यादव, माजी उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने, तालुकाप्रमुख आदेश जमदाडे, संतोष मुसळे, युवा अधिकारी समीर वीर, महिला आघाडी संघटिका कल्पना पवार, विभाग प्रमुख सागर ढमाळ, सागर कदम, अभय ननावरे, खंडाळा शहर प्रमुख गोविंद गाढवे, उपशहर प्रमुख प्रमोद शिंदे मा. शहर प्रमुख मंगेश खंडागळे, अमोल गाढवे, वाई शहरप्रमुख किरण खामकर, माजी सचिव दत्तात्रय राऊत यांचेसह अनेक पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.