सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
देगाव (ता. वाई) येथील मुरा नावाच्या शिवारात गेल्या दहा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याने गावातील गाई, वासरू, शेळी अशा नऊ जनावरांवर हल्ला केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. चक्क दिवसा ढवळ्या दोन बिबट्यांनी दर्शन दिले, त्यामुळे पळा…पळा.. बिबट्या आला म्हणण्याची वेळ लोकांच्यावर आली आहे.
देगावातील मुरा नावाच्या शिवारात शेतकऱ्यांना बिबट्या दिसलाआहे. बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे ग्रामस्थ कट्याने जनावरे घेऊन जाण्यासही घाबरत आहेत. शेतकरी, मजूर शेतशिवारात जाण्यास घाबरत गुरे-ढोरे चारणारे एक समूह बनवून एकाच जागी चारतात. परिसरात बिबट्याचा डोंगराच्या पायथ्याशी मुक्तसंचार वाढला आहे. बिबट्याने चरावयास गेलेल्या गाई, वासरू, शेळी यांच्यावर हल्ला करून ठार केले आहे.
वाई तालुक्यात दिवसा ढवळ्या बिबट्या रस्त्यावर @HelloMaharashtr pic.twitter.com/Fy2zthgfpF
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) November 21, 2022
दरम्यान, ग्रामस्थांनी शेतात जाताना घुंगराची काठी, कोयता सोबत घेऊनच जावे, तसेच शेतकऱ्यांनी बिबट्या जेरबंद होईपर्यंत एकट्याने फिरणे टाळावे, डोंगर परिसरात जायचे असल्यास समूहाने जावे, अशा सूचना वन विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत.