हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशिया आणि युक्रेनमध्ये अजूनही युद्ध सुरु असतानाच रशियामध्ये अंतर्गत बंडखोरी पाहायला मिळत आहे. रशियातील वॅगनर गटाने थेट राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात भूमिका घेतल्याचे दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर रशियन हेलिकॉप्टरने रशियाच्या व्होरोनेझमधील तेल डेपोवर कथित बॉम्बस्फोट केला आहे. याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
https://twitter.com/spectatorindex/status/1672544622801997828?s=20
व्होरोनेझमधील तेल डेपोवर बॉम्बफेक करण्यापूर्वी काही मिनिटांपूर्वी एक रशियन हेलिकॉप्टर हवेत उडत असल्याचे या व्हिडिओंमध्ये दिसत आहे. तसेच व्होरोनेझमधील तेल डेपोला रशियन हेलिकॉप्टरने लक्ष्य केल्यानंतर याठिकाणी मोठा स्फोट होऊन आग लागल्याचे दृश्यही या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. एकूण सर्व प्रकरण पाहता रशियामध्ये तणावाची परिस्थिती दिसत आहे.
दरम्यान, रशियातील स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले आहे की वॅगनरचे सैनिक त्यांच्या ताफ्यांना इंधन पुरवठा करण्यासाठी तेल डेपो ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मॉस्कोपासून दक्षिणेला सुमारे ५०० किमी (३१० मैल) दूर असलेल्या वोरोनेझचा ताबा वॅगनर ग्रुपने घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. व्लादिमीर पुतिन यांनी वॅगनर गटाच्या बंडखोरीचा निषेध केला आहे. रशियाचे विभाजन करणाऱ्यांना शिक्षा केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.