हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| युक्रेनसोबत झालेल्या युद्धामुळे रशियाचे जीवित आणि आर्थिक पातळीवर मोठे नुकसान झाले आहे. अशातच, “रशियन महिलांनी किमान 7ते 8 मुले जन्माला घालावीत” असे आवाहन रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केले आहे. वर्ल्ड रशियन पीपल्स कौन्सिलमध्ये बोलत असताना त्यांनी, रशियन महिलांनी जास्तीत जास्त मुलांना जन्माला घालून मोठ्या कुटुंबाला आदर्श बनवावे असे म्हटले आहे. पुतीन यांनी केलेल्या या आवाहनामुळे ते पुन्हा एकदा जगभरात चर्चेचा भाग बनले आहेत.
वर्ल्ड रशियन पीपल्स कौन्सिलवेळी व्लादिमीर पुतीन म्हणाले की, रशियन महिलांनी 7 ते 8 मुलांना जन्माला घालायला हवे. आमच्या आजी किंवा पणजींना सात-आठ मुले किंवा त्यापेक्षा अधिक असायची. रशियन महिलांनी आपल्या परंपरा जपल्या पाहिजेत, तसेच त्या पुनर्जिवीत करायला हव्यात. मोठे कुटुंब हे रशियातील सर्व लोकांसाठी आदर्श जीवन जगण्याची पद्धत असायला हवी. कुटुंब केवळ राज्य आणि समाजाचा पाया नाही, तर एक नैतिकतेचा स्त्रोत आहे.
त्याचबरोबर, “पुढील दशकांत आणि इतकंच नाही तर पुढील पिढ्यांसाठी रशियाची लोकसंख्या संरक्षित करणे आणि ती वाढवणे हेच आपले लक्ष्य आहे. हेच हजारो वर्षे जुन्या आणि शाश्वत रशियाचे भविष्य आहे” असे पुतीन यांनी सांगितले. दरम्यान, रशिया आणि युक्रेन युद्धांमुळे दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये रशियात 9 लाख नागरिकांनी देश सोडला आहे. तसेच, 50 हजार सैन्यांबरोबर हजारो नागरिक युद्धात मारले गेले आहेत. त्यामुळे याचा मोठा फटका रशियाला बसला आहे.