कोल्हापूर प्रतिनिधी । फुुलेवाडी रिंगरोड ते कळंबा साईमंदिर रिंगरोडवर नगरोत्थान योजनेअंतर्गत रस्त्यांची कामे सुरु आहेत. या कामाची पाहणी गुरुवारी आमदार ऋतुराज पाटील व स्थायी समिती सभापती शांरगधर देशमुख यांनी संबधीत अधिकाऱ्यांसमवेत केली. सदरची फिरती स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी आयोजीत केली होती.
यापुर्वी स्थायी समिती सभापती यांनी फिरती करुन या रस्त्यांवरील लिकेजेस व ड्रेनेज लाईनची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यापैकी बरीचसी कामे अद्याप अपूर्ण असल्याने सदरचा रस्ता पुर्ण करण्यास अडचण होत असल्याचे ठेकेदार अरुण पाटील यांनी सांगितले होते. साधारणत: ५ किलोमीटर रस्त्यापैकी ३.५ किलोमीटर रस्त्याचे काम करण्यासाठी ताब्यात दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. उर्वरीत रस्त्यावरील पाणी लिकेजची, ड्रेनेज लाईनची काम व खाजगी मिळकत ताब्यात घेणेची कार्यवाही अद्याप अपूरी असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
दरम्यान आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी पाणी परवठा, ड्रेनेज विभाग व टी.पी.विभागाने उर्वरीत कामे १० दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच यावेळी ”सदरचा रस्ता गेले १० वर्षापासून रखडला आहे. लोकांना त्याचा त्रास होत आहे त्यामुळे या रस्त्यावरील अडचणी आताच पूर्ण करा नाहीतर वारंवार लिकेज झाल्यास हा रस्ता पूर्ण करणे अडचणीचे होईल. एकदा रस्ता पूर्ण झालेवर पुन्हा उकरु नका. लोकांना त्रास नको, दुरदृष्टी ठेऊन कामाचे नियोजन करा” अशा सूचना संबंधीत अधिका-यांना त्यांनी दिल्या. तसेच पुढील आठवडयात आम्ही पुन्हा फिरती करु असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. तसेच ठेकेदार निर्माण कन्स्ट्रक्शन यांना या रिंगरोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजूस १० ते १२ फूटाची झाडे आपल्या वतीने लावण्याच्या सूचना दिल्या.