हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट हा तस बघितलं तर जेंटलमॅन खेळाडूंचा गेम आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, ऍडम गिलख्रिस्ट सारखे अनेक शांत स्वभावाचे खेळाडू क्रिकेटला मिळाले आणि त्यांनी या खेळाला एका नव्या उंचीवर नेलं. मात्र जसे शांत खेळाडू असतात तसेच काही आक्रमक स्वभावाचे खेळाडू सुद्धा क्रिकेटने पाहिले आहेत. यात अनेक दिग्गज खेळाडूंचा आणि नवनवीन विक्रम प्रस्थापित केलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. आता अशाच काही ११ खेळाडूंची Playing XI भारताचा माजी जलदगती गोलंदाज एस श्रीसंत ने बनवली आहे. या आक्रमक खेळाडूंची धुरा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या खांद्यावर सोपवण्यात आली असून ऑस्ट्रेलियन रिकी पॉन्टिंग हा या संघाचा उपकर्णधार आहे.
आक्रमक खेळाडूंच्या यादीत श्रीसंतने गौतम गंभीर आणि विराट कोहली या दोघांना सलामीवीर म्हणून स्थान दिले आहे. गंभीर आणि विराट यांच्यात आयपीएल दरम्यानचा वाद क्रिकेटप्रेमी अजूनही विसरलेले नाहीत. तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू रिकी पॉन्टिंगची निवड करण्यात आली आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूंना स्लेजिंग करण्यात आणि अनेकदा पंचाशी हुज्जत घालताना पंटर दिसला आहे. चौथ्या क्रमांकावर आक्रमण बाण्याचा सौरव गांगुली आहे. आरे ला कारे करण्याची क्षमता असलेला दादा श्रीसंतच्या संघाचा कर्णधार सुद्धा आहे.
पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी, बांगलादेशचा शाकिब अल हसन आणि वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डचं समावेश आहे. या तिन्ही खेळाडूंचा चढलेला पारा क्रिकेट रसिकांनी अनेकदा बघितला आहे. पोलार्डने तर एकदा पंचांच्या निर्णयाचा निषेध म्हणून थेट तोंडाला काळी टेप लावली होती, तर एकदा मिशेल स्टार्क च्या दिशेने बॅट फेकून मारली होती. शाकिबची तर औरच तर्हा आहे. अम्पायरचा निर्णय पटला नाही म्हणून थेट स्टंपलाच लाथ मारलेला शाकिबचा व्हिडिओ शोधलं मीडियावर वाऱ्यासारखा पसरला होता.
गोलंदाजांचा विचार केला तर श्रीसंतने कमेव फिरकी गोलंदाज म्हणून हरभजन सिंगला संघात ठेवले आहे. याच हरभजनने श्रीसंतला कानाखाली मारल्याची जोरदार चर्चा एकेकाळी सुरु होती. त्यानंतर शोएब अखतर, आंद्रे नेल आणि स्वतः श्रीसंत असे ३ जलदगती गोलंदाज श्रीसंतच्या संघात असतील. शोएब अख्तर 100 मैल प्रति तास वेगाने चेंडू टाकण्यात सक्षम होता. त्याचा राग यावरून समजू शकतो की एकदा रागाच्या भरात त्याने एमएस धोनीवर धोकादायक बीमर बॉल फेकला होता. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज आंद्रे नेल अनेकदा फलंदाजांची स्लेजिंग करत असे आणि श्रीसंतने शेवटचा गोलंदाज म्हणून स्वत:ला संघात स्थान दिले आहे.