अजित पवार पुण्याला लागलेल्या वाळवीचे किडे; सामनातून हल्लाबोल

ajit pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यामधील कल्याणी नगर येथे झालेल्या पोर्शे कारच्या भीषण अपघातामध्ये (Pune Porsche Accident) दोघांना प्राण गमवावा लागल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली. दररोज या अपघातासंदर्भात नवीन अपडेट्स समोर येत आहेत. आता या प्रकरणावरून राजकारण सुद्धा तापलं आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अपघातप्रकरणी तब्बल ६ दिवसांनी प्रतिक्रिया दिल्याने शिवसेना ठाकरे गटाचे अजितदादांवर निशाणा साधला आहे. अजित पवार पुण्याला लागलेल्या वाळवीचे किडे असं म्हणत सामनातून घणाघात करण्यात आलाय.

सामना अग्रलेखात काय म्हंटल?

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे इतक्या मोठय़ा दुर्घटनेनंतरही नेहमीप्रमाणे गायब म्हणजे ‘नॉट रिचेबल’ होते. हा त्यांचा आवडीचा छंद आहे. “मी पुण्याचा पालकमंत्री आहे व मी सांगेन तेच होईल,” असा सुका दम देणाऱया अजित पवारांनी या अपघातानंतर संवेदना व्यक्त करणे सोडाच, पण दोन ओळींचे निषेधपत्रही काढले नव्हते. आता दुर्घटनेनंतर तब्बल सहा दिवसांनी अजित पवारांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ‘कितीही श्रीमंत बापाचा पोरगा असला तरी कारवाई होणारच,’ असे ते म्हणाले. मात्र ‘च’वर जोर देऊन हे सांगायला त्यांनी सहा दिवस का घेतले? या प्रकरणात अगदी सुरुवातीपासून राजकीय हस्तक्षेप दिसून आला असताना असा कुठलाही प्रकार नाही, असा निर्वाळा पुण्याचे पालकमंत्री सहा दिवसांनी का देत आहेत? असा सवाल सामनातून करण्यात आलाय.

पहिल्या दिवसापासून या घटनेकडे आपले लक्ष आहे असा खुलासा करायला त्यांना एक आठवडा लागला यातच सगळे आले. पुण्यात एकंदरीत घाशीराम कोतवालाचेच राज्य पुन्हा अवतरले असून सरकारने त्या घाशीरामी कारभाराची सूत्रे तेथील पोलीस आयुक्तांना दिलेली स्पष्ट दिसतात. ज्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत दारू पिऊन दोन तरुण जिवांचा खून केला तो अल्पवयीन वगैरे अजिबात नाही. त्याचे वय साडेसतरा इतके आहे. म्हणजे तो चांगला सज्ञान आहे. त्याच्यावर प्रौढ म्हणूनच खटला चालायला हवा व ‘निर्भया’ प्रकरणात तेच घडले आहे. पण जोपर्यंत फडणवीस यांचा हस्तक पोलीस आयुक्तपदी बसला आहे तोपर्यंत मृतांना न्याय मिळणार नाही.

धंगेकर यांनी आयुक्तांवर केलेले आरोप गंभीर आहेत. बिल्डरांच्या पाकिटावर आयुक्त काम करतात हा त्यांचा आरोप दुर्लक्षित करता येणार नाही. धंगेकर हे आमदार आहेत व इतर आमदारांप्रमाणे विकत घेतले जातील अशा वर्गात मोडणारे नाहीत. भाजप व अजित पवारांचे सर्व घाशीराम या प्रश्नी तोंड शिवून बसले असताना धंगेकर यांनी हे प्रकरण लावून धरले व एका बेवडय़ा श्रीमंताने केलेले दोन खून सहज पचवले जाऊ नयेत म्हणून ते उभे ठाकले आहेत. पुण्याला वाळवी लागली आहे व अजित पवारांसारखे लोक त्या वाळवीचे किडे आहेत. पुण्यात बिल्डरांचे राज्य त्यांनीच निर्माण केले अशी जळजळीत टीका ठाकरे गटाने अजित पवारांवर केली आहे.