हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलयानंतर (shivaji maharaj statue fall down) राजकीय वातावरण सुद्धा तापलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाऱ्यामुळे पुतळा पडला असा निष्कर्ष काढला. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री मिंधे, तुम्हाला माफी नाही. सत्ता सोडा, प्रायश्चित्त घ्या, असे कोडग्यांना सांगणे व्यर्थ ठरते, पण तुम्हाला जावेच लागेल. शिवप्रेमी जनताच तुम्हाला घालवेल असं म्हणत सामनातून शिंदेंवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल?
नरेंद्र मोदी व त्यांचे भंपक लोक भारताचे हिंदू राष्ट्र बनवायला निघाले आहेत, पण त्यांना सगळय़ांना मिळून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा धड बनवता आला नाही व सिंधुदुर्ग किल्ल्यावर भक्कमपणे उभारता आला नाही. फक्त आठ महिन्यांपूर्वी नौदल दिनी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळून पडला आहे. महाराजांचा पुतळा कोसळला याचा अर्थ महाराष्ट्राची आन, बान शान कोसळून पडली. भ्रष्टाचाराने पोखरलेल्या तकलादू चौथऱ्यावर महाराजांचा पुतळा उभा राहिला होता. तो इतक्या घिसाडघाईने उभा करू नका असे बजावण्यात आले होते, तरीही लोकसभा निवडणुकीचा हिशेब करून पुतळय़ाचे अनावरण केले गेले. तो पुतळा आज राहिलेला नाही, त्याचे छिन्नविच्छिन्न अवशेष पाहणे मराठी जनांच्या नशिबी आले. पंतप्रधानांनी 4 डिसेंबर 2023 रोजी पुतळ्याचे अनावरण केले तेव्हा शिवरायांच्या विचारांची महती त्यांनी सांगितली, पण शिवरायांना भ्रष्टाचार आणि व्यभिचाराचा तिटकारा होता व असे गुन्हे करणाऱ्यांना त्यांच्या दरबारात माफी नव्हती. कडेलोट हीच त्यांची शिक्षा होती हे सांगायला मोदी विसरले.
मोदींच्या राज्यात भ्रष्टाचार, बेइमानी, व्यभिचारास मुक्त रान आहे व आशीर्वाद आहे. महाराष्ट्रात हे जास्त आहे. अशा राज्यकर्त्यांनी उभारलेला शिवरायांचा पुतळाच कोसळून पडला. महाराष्ट्राच्या जनतेने यामागचा अर्थ आणि संकेत समजून घेतले पाहिजेत. पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतील ते सर्व कोसळताना दिसत आहे. त्यांनी उभारलेले एअरपोर्ट, अनेक पूल, अयोध्येतील राममंदिर आणि गळू लागले. सत्तर वर्षातले हे पहिले पंतप्रधान आहेत, जे आपल्याच कार्यकाळात आपल्याच हाताने बनवलेल्या वास्तू कोसळताना पाहत आहेत. आता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळाच कोसळला. मुख्यमंत्री मिंधे म्हणतात, जोरदार वारा, समुद्राच्या बदलत्या हवामानामुळे पुतळा पडला. ते खोटे बोलत आहेत. बेफिकिरी, घाणेरडे राजकारण, ठाण्यातल्या लाडक्या ठेकेदारांना पुतळा उभारणीचे दिलेले काम व त्यात झालेली खाऊबाजी यामुळे महाराजांचा पुतळा कोसळला.
शिवरायांनी बांधलेला किल्ले सिंधुदुर्ग 375 वर्षे भर समुद्रात हाच वादळवारा, लाटा सहन करीत उभा आहे. गिरगावच्या चौपाटीवर समुद्राच्या शेजारी लोकमान्य टिळकांचा पुतळा 1933 साली उभा केला. तो ठामपणे उभा आहे. 1957 साली किल्ले प्रतापगडावर पंतप्रधान पंडित नेहरूंनी शिवरायांच्या पुतळयाचे अनावरण केले तो पुतळाही जसाच्या तसा आहे, पण सिंधुदुर्गातील राजकोटावरील पुतळा आठ महिन्यांत कोसळला. याची जबाबदारी घेऊन सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची हकालपट्टी करायला हवी असं सामनातून म्हंटल आहे.
ठाण्याच्या जयदीप आपटे या तरुण शिल्पकाराने हा पुतळा बनवला. 28 फूट उंचीचा हा असा भव्य ब्रॉन्झचा पुतळा बनवण्यास साधारण तीन वर्षे लागतात, पण आपटे यांनी हा पुतळा फक्त सहा महिन्यांत बनवून सरकारच्या हवाली केला. दुसरे असे की, नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार बनवलेली शिल्पे न निवडता आपटे यांनी स्वतःच बनवलेले एक शिल्प सरकारला सोपवले व त्याच्या मजबुतीची, सुरक्षेची कोणतीही शहानिशा न करता हे शिल्प सिंधुदुर्गातील राजकोटावर उभे केले गेले. या पुतळय़ाची अल्पावधीतच दुरवस्था झाली. ज्या 18 बोल्टच्या सहाय्याने पुतळा उभा केला ते 18 बोल्ट गंजले व पुतळाही विद्रूप झाला. तो पुतळा आता चौथऱ्यावरून कोसळून पडला व मुख्यमंत्री मिंधे हसत सांगत आहेत की, राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा नवा पुतळा उभा करू. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. तुमचे पापी हात पुन्हा शिवरायांच्या पुतळयास लागता कामा नयेत. तुमच्या पापाच्या कमाईचा दमडाही या पवित्र कार्यात लागता कामा नये. शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा साक्षीदार हाच सिंधुदुर्ग किल्ला आहे. लढण्याची प्रेरणा याच सिंधुदुर्गाने महाराष्ट्राला दिली. त्या किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा कोसळला. मुख्यमंत्री मिंधे, तुम्हाला माफी नाही. सत्ता सोडा, प्रायश्चित्त घ्या, असे कोडग्यांना सांगणे व्यर्थ ठरते, पण तुम्हाला जावेच लागेल. शिवप्रेमी जनताच तुम्हाला घालवेल. लक्षात ठेवा! असा इशारा ठाकरे गटाचे सामनातून दिला आहे.