सचिन तेंडुलकरही बनला डीपफेकचा शिकार; व्हिडिओ शेअर करत सर्वांना केले कळकळीचे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या सोशल मीडियावरून डीपफेकची प्रकरणे दिवसेंदिवस समोर येताना दिसत आहेत. आता या डीपफेकच्या जाळ्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील अडकला अडल्याचे समोर आले आहे. याची माहिती स्वतः सचिन तेंडुलकरने एक व्हिडिओ शेअर करत दिली आहे. या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर, आपल्या मुली बद्दल म्हणजेच सारा तेंडुलकरबद्दल खोटी माहिती देताना दिसत आहे. परंतु “या व्हिडिओवर विश्वास ठेवू नका, हा व्हिडीओ फेक आहे” असे सचिन तेंडुलकरने म्हटले आहे.

नुकताच सचिन तेंडुलकरने आपल्या एक्स अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन सांगत आहे की, “माझी मुलगी एविएटर गेम खेळून दररोज लाखो रुपये कमवत आहे. याचे मलाच आश्चर्य वाटते की आता पैसे कमवणे खूपच सोपे झाले आहे. त्यामुळे तुम्ही देखील ही गेम डाउनलोड करा आणि पैसे कमवा.” परंतु हा व्हिडिओ खोटा असल्याची माहिती स्वतः सचिन तेंडुलकरने दिली आहे.

सचिन तेंडुलकरने ट्विट करत म्हटले आहे की, “हा व्हिडिओ खोटा असून तो तुम्हाला फसवण्यासाठी बनवला आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्याचा हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की, असे व्हिडिओ किंवा अॅप्स किंवा जाहिराती दिसल्यास त्वरित कळवा”

तसेच, “सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने देखील सावधगिरी बाळगली पाहिजे आणि त्यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारींवर लवकरात लवकर कारवाई करावी. चुकीची माहिती आणि बातम्यांना आळा बसावा आणि डीपफेकचा गैरवापर थांबवता यावा यासाठी त्यांची भूमिका या बाबतीत खूप महत्त्वाची आहे” असे आवाहन सचिन तेंडुलकरने केले आहे.

दरम्यान, सर्वात अगोदर सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना हीचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर अभिनेत्री कटरीना कैफचा असाच एक फोटो समोर आला होता. इतकेच नव्हे तर त्यानंतर सारा तेंडुलकर हीचा देखील डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता सचिन तेंडुलकर देखील या डीपफेकचा शिकार झाल्याचे समोर आले आहे