कोरोना विरोधात क्रिकेटचा देव मैदानात; सचिन कडून मिशन ऑक्सिजनसाठी 1 कोटींची मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच देशात ऑक्सिजन, बेड आणि व्हेंटिलेटरच्या तुटवड्यामुळे रूग्णांचा तडफून मृत्यू होत आहे. याच दरम्यान क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मदतीला धावला आहे. सचिन तेंडूलकरने मिशन ऑक्सिजन या मोहिमेसाठी 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. 250 उद्योजक तरूणांनी सुरू केलेल्या या मोहिमेत सचिनने सहभाग घेतला आहे.

सचिन म्हणाला, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण केला आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवणे ही सध्याच्या तासाची गरज बनली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहून दुःख होत आहे. २५०+ अधिक युवा उद्योजकांनी मिशन ऑक्सिजनची सुरूवात केली आहे. त्याच्या माध्यमातून ते निधी गोळा करून ऑक्सिजन खरेदी करणार आहेत आणि देशातील हॉस्पिटल्सना दान करणार आहेत.”

तसेच, “मी खेळत असतााना तुमच्याकडून मिळालेला पाठिंबा अमूल्य होता, त्यामुळे मी यश मिळवू शकलो…आज आपण करोनाविरोधात लढणाऱ्यांच्या मागे ठामपणे उभं राहण्याची आणि त्यांना पाठिंबा देण्याची वेळ आहे”, अशा आशयाचा संदेशही यावेळी त्याने दिला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सचिनलाही करोनाची लागण झाली होती. नंतर करोनामधून सावरल्यावर अलिकडेच त्याने प्लाझ्मादेखील दान करण्याचे आवाहन केले होते. एक व्हिडिओ शेअर करुन मी प्लाझ्मा दान करणार असून तुम्हीही प्लाझ्मा दान करायला हवे असे आवाहन केले होते.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like