हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने आता राज्यातील ऊस (Sugarcane) परराज्यात निर्यात करण्यास बंदी आणली आहे. या संबंधित आदेश अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी काढले आहेत. या निर्णयाचा ऊस व्यावसायिकांना मोठा तोटा बसणार आहे. याच पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. तुम्ही आम्हाला लुटणार असाल, तर साखर आयुक्त कार्यालय सुद्धा आम्ही जाळून टाकू असं म्हणत सदाभाऊंनी इशारा दिला आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले, शेतकऱ्यांच्या उसाला या वर्षी सोन्याचा भाव मिळणार आहे. पण सरकारला शेतकऱ्याचा उस भंगाराच्या भावात खरेदी करायचा आहे. त्यामुळे सहकार विभागाने आणि सरकारने शेतकऱ्यांना बाहेरच्या राज्यात उस देण्यावर मनाई केली आहे. खरं तर शेतकऱ्यांवर हा मोठा अन्याय आहे. पुण्यातील सहकार आयुक्त कार्यालय हे शेतकऱ्यांना, ऊस उत्पादकांना लुटण्याचं कोठार आहे. तुम्ही आम्हाला लुटणार असाल, तर साखर आयुक्त कार्यालय सुद्धा आम्ही जाळून टाकू असा थेट इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला.
सदाभाऊ पुढे म्हणाले, आमच्या बापानं आणि आम्ही पिकवलेला उस साखर कारखान्यांना द्यावा की, कर्नाटकला द्यावा की, गुजरातला द्यावा हा आमचा अधिकार आहे. पण दोन पैसे शेतकऱ्याला मिळायला लागले की सरकारच्या पोटात दुखतं. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना आदरणीय देवेंद्रजींना मी आवाहन करतो की राष्ट्रवादीच्या वळू बैलांना शेतकऱ्यांच्या बांधावर सोडू नका, नाहीतर महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी राष्ट्रवादीच्या या या वळू बैलांना ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी आक्रमक पवित्रा घेतला




