हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांच्या लेखी परीक्षेतील गोंधळामुळे अखेर ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. यानंतर पुन्हा एकदा राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैली झडत आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंवर निशाणा साधला. अहो आरोग्यमंत्री साहेब, वसुलीचा आकडा ठरलं नसल्यामुळे परीक्षा रद्द झाली आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.
सदाभाऊ खोत यांनी ट्विट करत म्हंटल की, एक रात्री आधी असा काय शासनाला साक्षात्कार झाला की आरोग्य भरतीच्या परीक्षा रद्द करायचा चमत्कार करावा लागला. अहो आरोग्यमंत्री साहेब, वसुलीचा आकडा ठरलं नसल्यामुळे परीक्षा रद्द झाली आहे का? महाभकास आघाडी अजून विद्यार्थ्यांसोबत किती छळ करणार?, असा सवाल खोत यांनी केला आहे.
एक रात्री आधी असा काय शासनाला साक्षात्कार झाला की #आरोग्य_भरतीच्या परीक्षा रद्द करायचा चमत्कार करावा लागला.
अहो आरोग्यमंत्री साहेब, #परीक्षा_रद्द ही वसुलीचा आकडा ठरलं नसल्यामुळे झाली आहे का?
महाभकास आघाडी अजून विद्यार्थ्यांसोबत किती छळ करणार…@rajeshtope11 @CMOMaharashtra pic.twitter.com/bZkKEiAAjv
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) September 25, 2021
दलाल घुसल्यामुळे परीक्षा रद्द- फडणवीस
दरम्यान, आरोग्य विभागात दलाल घुसल्याने परीक्षा रद्द केली असल्याची शंका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केली. सरकारमध्ये नक्की काय चाललंय समजत नाही. परीक्षा कधी घेतात, कधी रद्द करतात. याचं कुठलंही टाइमटेबल नाहीय. कुठलंही ताळतंत्र नाहीय. काही दलाल मार्केटमध्ये आलेले आहेत, या पदांसाठी त्यांच्यापासून 5 लाख, 10 लाख गोळा करण्याचे प्रकार घडत आहेत, हे गंभीर आहे, या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावं. असा आरोप फडणवीसांनी केला.