राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी नव्हे, तर खासदारकीसाठी लढत होते; सदाभाऊ खोतांचा घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजू शेट्टी (Raju Shetti) याना शेतकऱ्यांचं काही देणघेणं नव्हतं. ते शेतकऱ्यांसाठी नव्हे तर खासदारकीसाठी लढत होते असं म्हणत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राजू शेट्टी यांच्यावर जहरी टीका केली आहे. तसेच महाविकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी राजू शेट्टी यांनी सतेज पाटील आणि जयंत पाटील यांना लिहून दिलं होतं की, मी तुमचा गुलाम राहणार आहे अशा शब्दात सदाभाऊंनी राजू शेट्टींवर तोंडसुख घेतलं. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांचा सत्कार सोहळा शिराळमध्ये आयोजीत केली होता, त्यावेळी आपल्या भाषणात सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर घणाघात केला.

जो माणूस म्हणत होता की मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे. मी कोणत्याही आघाडीत जाणार नाही. मी शेतकऱ्यांसाठी लढत असून मी शेतकऱ्यांचाच उमेदवार असणार आहे. पण त्याच माणसाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना लिहून दिलं होतं की, मी तुमचा गुलाम राहणार आहे. फक्त मला पाठिंबा द्या”,असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडलं.

सदाभाऊ पुढे म्हणाले, राजू शेट्टी शेतकऱ्यांना सांगायचे की त्यांच्याविरोधात लढायचं. हे ते उघड बोलले आहेत. त्यामुळे निश्चितपणे राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी लढत नव्हते, तर ते फक्त खासदारकीसाठी लढत होते. हे आता स्पष्ट झालं आहे”, असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. सदाभाऊ खोत यांच्या या टीकेला राजू शेट्टी नेमकं कोणत्या शब्दात प्रत्युत्तर देतात ते पाहायला हवं. मात्र आगामी काळात या दोन्ही शेतकरी नेत्यांमध्ये आरोप – प्रत्यारोप वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.