Wednesday, June 7, 2023

जरंडेश्वर कारखान्याप्रकरणी अमित शहांकडे तक्रार करणार – सदाभाऊ खोत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर शुगर मिल या कारखान्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबाबत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याप्रकरणी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडेच थेट तक्रार करणार असे म्हंटले आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असणारा जरंडेश्वर शुगर मिल या कारखान्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली. यानंतर आता या कारखान्यावर केलेल्या कारवाईबाबत सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. या कारखान्याबाबत माहिती देताना त्यांनी म्हंटल आहे की, सुमारे ७ कोटी रुपयांना खरेदी केलेला हा कारखान्यावरती तब्बल ४०० कोटी रुपयांचे कर्ज दिले गेले आहे.

आता जरंडेश्वर शुगर मिल या कारखान्यावर कारवाई झाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना ऊस कोठे घालायचा? असा प्रश्न पडला आहे शेतकऱ्यांचे नुकसान टाळायचे असेल तर या कारखान्यावर तत्काळ प्रशासकाची नेमणूक करावी तसेच सहकार क्षेञात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करावी, अशा मागणीचे पत्र लिहून केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना देणार असल्याचे खोत यांनी म्हंटले.

यावेळी खोत यांनी राज्यातील इतर ५५ सहकारी साखर कारखान्याची झालेली विक्री तसेच ज्या कवडीमोल किमतीत हे कारखाने खरेदी केले गेले. त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करीत अनेक समाजसेवकांनी जी आंदोलने केली. मात्र, हि कारखाने कवडीमोल दराने विकले गेले असल्याचा आरोप यावेळी खोत यांनी केला.