सातारा | प्लॉटच्या खरेदी- विक्री व्यवहारात खोटी तयार लाख कागदपत्रे करून 11 कोटी तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील साहेबराव देशमुख को- ऑपरेटिव्ह बँकेच्या पदाधिकाऱ्यांवर शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
बँकेचे तत्कालीन चेअरमन सुभाष देशमुख, सध्याचे चेअरमन बिपिन कुरतडकर, वसुली अधिकारी खामकर, जनरल मॅनेजर अनिल कदम, अधिकारी विठ्ठल आनंद चिकणे, बँकेचे वकील एस. डी. जाधव, सातारा शाखा व्यवस्थापक अरविंद धनवडे, साधना जाधव, अरुण गुलाबराव नलवडे (रा. वाढे, ता. सातारा), क्रिस्टल बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपरर्समधील बँकेचे चेअरमन सुभाष देशमुख यांची पत्नी स्वाती भानुदास कणसे, संचालक प्रकाश जुनघरे यांची पत्नी व सुभाष देशमुख यांची बहीण सुनीता प्रकाश जुनघरे, अनिल शांतिलाल मेहता, बिना अनिल मेहता, विशाल नरेंद्र शहा, जमिनीचे मूळ मालक विजय हणमंतराव शिंदे, व्हॅल्यूएटर अशोक गायकवाड, राजेंद्र व्ही. तरडे, सी. ए. राजेश्वर कासार यांच्यासह अन्य संशयितांवर हा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी संजय चंद्रकांत मोरे (वय- 63, रा. वाई, जि. सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे, की ही घटना 2010 ते 21 जानेवारी 2023 या कालावधीत घडली. शिंदे यांची खिंडवाडी येथे सुमारे साडेदहा एकर शेत जमिनीवर साहेबराव देशमुख को. ऑप बँकेचे तीन कोटी रुपयांचे कर्ज असतानाही ती जमीन क्रिस्टल बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स या नावाची बनावट फर्म स्थापन करून तिला विकली. त्याबाबत संशयित चेअरमन यांनी तलाठी व मंडलाधिकाऱ्यांकडे अर्ज दिला. त्यानंतर जमिनीच्या उताऱ्यावरील फर्मचे नाव रद्द करण्यात आले. त्यानंतर मूळ मालक शिंदे यांनी ती जमीन बिगर शेती करून 75 प्लॉट तयार केले. त्यापैकी सहा प्लॉट विकण्यास बँकेने परवानगी दिली. दरम्यान, क्रिस्टल बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स मालक नसतानाही पाच प्लॉट विविध लोकांना विकले.
उर्वरित प्लाट क्रमांक नऊ हा सुमारे 63 हजार स्केअर फुटाचा प्लॉटही संशयितांपैकी एकाला विकण्यात आला. तो विकताना त्याच्या नावाने बनावट सर्च रिपोट, व्हॅल्यूएशन रिपोर्ट तयार करून संबंधिताला विक्रीच्या दिवशीत 2 कोटी 50 लाख रुपयांचे कर्ज दिले. ते कर्ज थकल्याने वसुलीपोटी तो प्लॉट, तसेच उर्वरित 2 लाख 21 हजार 314 स्केअर फुटाचे एकूण 69 प्लॉट मोरे यांना लिलावाने 8 कोटी 3 लाख 62 हजार रुपयांना विकण्यात आले. तसेच त्या व्यवहाराकरिता फिर्यादीच्या मित्रांच्या तीन मालमत्तांवर चार कर्ज प्रकरणातून प्रत्येकी 40 लाख रुपयांची पाच कर्ज प्रकरणेही करण्यात आली. तसेच या व्यवहारासाठीचा 1 कोटी रुपयांचा नोंदणी खर्च अशी संशयितांनी एकूण 11 कोटी 3 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे मोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर तपास करत आहेत.