कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सह्याद्री व कृष्णा सहकारी साखर कारखान्यांनी गेल्या गळीत हंगामातील उसाची थकित एफआरपी शेतकऱ्यांना येत्या पंधरा दिवसात द्यावी. अन्यथा रयत क्रांति संघटनेच्या वतीने दोन्ही कारखान्यावरती तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा रयत क्रांति संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
जेष्ठ नेते सुदाम चव्हाण, तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, योगेश झांम्बरे व शेतकऱ्यांच्या उपस्थित आज प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले. गेल्या वर्षीचा गळीत हंगाम पूर्ण होवून पाच महीने झाले, तरी शेतकऱ्यांना अद्यापही पूर्ण एफआरपीची रक्कम दोन्ही कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिलेली नाही. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना चालू वर्षीच्या रिकवरी नुसार एफआरपी देण्याचा निर्णय घेतल्याने काही कारखान्यांच्या एफआरपीमध्ये मोठा फरक पडलेला आहे. तरी सर्व साखर कारखान्यांनी मागील वर्षीच्या साखर उताऱ्या नुसार शेतकऱ्यांना वाढीव दर देण्याची मागणी ही निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच इथेनॉल, विज निर्मिती, मळी व इतर उप पदार्थातून मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा अधिकचा दर शेतकऱ्यांना देता येतो. तो साखर कारखान्यांनी द्यावा. तसेच चालू वर्षीच्या रिकवरीनुसार दर देणाऱ्या साखर कारखान्यांच्या मागील आर्थिक अहवाल साखर आयुक्तांनी तपासावा. जास्तीच्या एफआरपीचा फरक शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.