कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
देशातील सहकारी साखर उद्योगाला मार्गदर्शन करणार्या नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज लि. नवी दिल्ली या संस्थेकडून देशभरातून जास्तीत जास्त साखर निर्यात केल्याबद्दल सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास गाैरविण्यात आले आहे.
सन 2019-20 आणि 2020-21 या दोन्ही वर्षांकरीता द्वितीय क्रमांकाचे दोन स्वतंत्र पुरस्कार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, माजी केंद्रिय कृषीमंत्री खासदार शरद पवार, महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीपराव वळसे- पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, फेडरेशनचे उपाध्यक्ष केतनभाई शाह यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिल्ली येथे समारंभपूर्वक सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास प्रदान करण्यात आले. सदर पुरस्कार कारखान्याच्यावतीने कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, फायनान्सिअल ॲडव्हायझर एच.टी.देसाई, डे.चीफ अकौन्टंट बी.जी.कुंभार यांनी स्विकारले.
वसंतदादा शुगर आणि नॅशनल फेडरेशनकडून सह्याद्रीचा सन्मान
मुख्यतः यापूर्वी कारखान्यास उत्तम ऊस विकास पुरस्कार, उच्च् तांत्रिक क्षमता पुरस्कार, उत्तम आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार देवून नॅशनल फेडरेशन ऑफ को- ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज्ने अनेकवेळा सह्याद्रि कारखान्याचा गौरव केलेला आहे. तर राज्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे यांनीही उत्तम आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार देवून कारखान्यास सन्मानित केले आहे.