कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या काळात शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस दर जाहिर करणे बंधनकारक आहे. तेव्हा शासनाच्या या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या साखर कारखान्यावर प्रशासनाने फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलावडे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन कराड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिले आहे.
शासनाने 21 फेब्रुवारी 2022 च्या शासन निर्णयानुसार, साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने निश्चित केलेल्या दराची प्रसिध्दी हंगाम सुरू करण्यापुर्वी जास्त खप असलेल्या दोन स्थानिक वर्तमानपत्रात व कारखाना स्थळावर माहितीसाठी प्रसिध्द करणे बंधनकारक राहील. अशा प्रकारे प्रसिध्द केलेल्या दरानुसारच संपूर्ण हंगामात ऊस दर आदा करणे बंधनकारक राहील. कराड तालुक्यामध्ये रयत अथनी शुगर (म्हासोली- शेवाळेवाडी) या एकाच कारखान्याने या वर्षीचा ऊस दर वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द केलेला आहे. तर कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखाना (यशवंतनगर), कृष्णा सहकारी साखार कारखाना (रेठरे), जयवंत शुगर (धावरवाडी) या साखर कारखान्यांनी अद्याप आपला ऊस दर जाहीर केलेला नाही.
सह्याद्री साखर कारखान्यांचा अद्याप दर जाहीर नाही
सदर कारखान्यानी हंगाम सुरू होण्यापुर्वी आपले ऊस दर जाहिर नाही केले, तर शासन निर्णयानुसार सदर कारखान्याचे चेअरमन, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक यांच्यावरती शेतकरी सभासंदांचा विश्वासघात केल्या बददल फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदरचा निर्णय माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी जाहीर केला आहे. तेव्हा अजूनही त्याच्या सह्याद्री साखर कारखान्याने तसेच जयवंत शुगर आणि कृष्णा कारखान्याने दर जाहीर केला नाही. तो दर जाहीर करावा अन्यथा यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलावडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.