कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर मधील नाव गावातील काही ग्रामस्थांनी सांबर या प्राण्यांची शिकार केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. सांबराची शिकार केल्यानंतर त्याचे मांस शिजवत असल्याची गुप्त माहिती वन्यजीव विभाग हेळवाक यांना समजली. गोपनीय माहितीच्या आधारे वनक्षेत्रपाल संदीप जोपळे यांनी छापा मारून 5 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील नाव गावामध्ये सांबर प्राण्यांची शिकार करण्यात आली. त्यानंतर एका घरात सांबरचे मांस शिजवले जात असल्याची गुप्त माहिती वन्यजीव विभागास मिळाली. शिकारी करण्यासाठी एकत्रित असलेल्यापैकी एकाला शिकारीचा वाटा न मिळाल्याने वनविभागाला याबाबतची माहिती मिळाली. माहिती मिळताच वनविभागाने छापा टाकला.
वनविभागाच्या छाप्यात सीताराम शेंडे, विशाल पवार, अशोक विचारे, महेंद्र जगताप , आनंद विचारे (रा .नाव ता. पाटण) यांना अटक करण्यात आली. संशयितांना अटक केल्यानंतर पाटण न्यायालयत हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.