Thursday, February 2, 2023

सह्याद्रि`स सलग दुसऱ्यांदा साखर निर्यातीचा पुरस्कार

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

देशातील सहकारी साखर उद्योगाला मार्गदर्शन करणाऱ्या नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज लि. नवी दिल्ली या संस्थेकडून, परदेशात जास्तीत जास्त साखर निर्यात केल्याबद्दल मागील 2019-20 वर्षाप्रमाणे याहीवर्षी सन 2020-21 सालाचा राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार कराडच्या सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे.

- Advertisement -

कारखान्याचे चेअरमन, राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज सुरू असून, कारखान्याने कोरोनासारख्या प्रतिकूल परिस्थितीतही देशभरातून जास्तीत जास्त साखर निर्यात केल्याबद्दल कारखान्यास सलग दुसऱ्यांदा पुरस्कार जाहीर झाला आहे.

देशाला परकीय चलन उपलब्ध होऊन अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी केंद्र सरकारने साखर निर्यात करण्याबाबत जाहीर केलेल्या योजनेअंतर्गत सन 2020- 21 या आर्थिक वर्षात सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने, नामदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 5,23,471 क्विंटल इतक्या मोठ्या प्रमाणात साखर निर्यात केली आहे, सर्वाधिक साखर निर्यातीचे सलग दुसरे वर्ष आहे. या साखर निर्यातीपासून देशाला रुपये 170 कोटी 80 लाख रकमेचे परकीय चलन मिळाले.

सदर निर्यातीस केंद्र सरकारकडून अनुदानासह मिळालेला सरासरी दर प्रति क्विंटल रुपये 3262.80 इतका आहे, ती देशांतर्गत साखर विक्रीच्या सरासरी दरापेक्षा क्विंटलला रुपये 146/- ने जादा आहे. सन 2019-20 आणि सन 2020- 21 या दोन्ही वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण 16 नोव्हेंबर, 2021 रोजी नवी दिल्ली येथे सन्मानपूर्वक करण्यात येणार आहे.